राहाणेचे शतक; भारत सावरला

शुक्रवार, 18 जुलै 2014 (10:15 IST)
वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने भेदक गोलंदाजी केल्यामुळे लॉर्डस् मैदानावर दुसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्यात   भारताचा पहिला डाव गडगडला होता मात्र अजिंक्य राहाणे याने शतकीय खेळी केल्यामुळे भारताचा डाव सावरला.

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्‍या लॉर्डस् मैदानावरील राहाणे याचे हे पहिले शतक ठरले. राहाणने सावध खेळ करत भारताची होत असलेली पडझड रोखली. राहणे आणि भुवनेश्वर कुमार यांनी आठव्या विकेटसाठी 90 धावांची भारगीदारी केली. राहणेने 103 धावा केल्या त्याला अँडरसन याने बाद केले. पहिल्या सामन्यातील रटाळ खेळ आणि अँडरसन-जडेजा प्रकरणाची गरमागरमी या पार्श्वभूमीवर या कसोटी सामन्यात सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार अलेस्टर क्रुकने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. पहिल्या कसोटीत खेळलेले दोन्हीही संघ कायम ठेवण्यात आले. लॉर्डस्वरील खेळपट्टी ही हिरवीगार अशी होती. खेळपट्टीवर गवतही होते.

त्यामुळे खेळपट्टीची वेगवान गोलंदाजाला साथ मिळाली. क्रिकेट पंढरीत भारताच्या संघातील बहुतांशी खेळाडू प्रथमच खेळत आहेत. त्यामुळे त्यांचवर दडपण होते. भारताची सुरुवात खराब ठरली. अँडरसनने शिखर धवनला (7) टिपले. तर प्लंकेटने मुरली विजयला (24) बाद केले. या दोघांचेही झेल स्लीपमध्ये बॅलन्सने घेतले. हे दोघे बाद झाल्यानंतर विराट कोहलीला मोईन अलीच्या चेंडूवर यष्टीरक्षक मॅट प्रारने जीवदान दिले. चेतेश्वर पुजारा (28) आणि विराट कोहली (25) या दोघांनी तिसर्‍या जोडीस 38 धावांची भर घातली. तत्पूर्वी पुजारा व मुरली विजयने दुसर्‍या जोडीस 37 धावा जोडल्या.

भारताचे फलंदाज क्रमक्रमाने बाद होत गेले. मोहम्मद शमी 14 धावावर खेळत आहे तर इशांत शर्मा 12 धावांवर खेळत आहे. भारताने पहिल्या दिवशीचा खेळ संपताना पहिल डावात 9 बाद 290 धावा केल्या होत्या. भारताच्या खेळाचे वैशिष्टय़े 30 चौकार 1 षटकार.

वेबदुनिया वर वाचा