भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियास व्हाईट वॉश

वेबदुनिया

सोमवार, 25 मार्च 2013 (10:47 IST)
FILE
'यंगिस्तान'चा भरणा असलेल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करताना ऑस्ट्रेलियन संघास ४-० ने व्हाईट वॉश देण्याचा महापराक्रम साधला आहे. 'दिल्ली दूर' असल्याचे भासत असतानाच रविंद्र जडेजाने दुसर्‍या डावांत कांगारूंचे अवघ्या १६४ धावांत वस्त्रहरण केले आणि राहिलेली कामगिरी चेतेश्वर पुजाराने आत्मविश्वासी नाबाद ८२ धावा तडकावत चोख बजावली.

भारताने याअगोदर १९९३-९४ मध्ये श्रीलंकन वाघांना ३-० ने व्हाईट वॉश दिला होता. यानंतर तब्बल २० वर्षांनी हा ‍दुर्मिळ महायोग आला. मात्र क्रिकेट जगतावर निर्विवाद वर्चस्व गाजवणार्‍या ऑस्ट्रेलियन संघावरील हा विजय निश्चितच मोठा आहे.

ऑस्ट्रेलियाने भारतास पहिल्या इनिंगमध्ये २७२ धावांत गारद करून बाजी पलटवण्याचा इरादा जाहिर केला होता. मात्र रविंद्र जडेजाच्या फिरकीने त्यांचे मनसूबे फिरोजशहा कोटलाच्या खेळपट्टीवरील धुळीत मिळाले. कांगारूंनी भारतासबोर १५५ धावांचे लक्ष ठेवले. प्रत्युत्तरात चेतेश्वर पुजारा व विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी करत झटपट विजय दृष्टिपथात आणल्यानंतर ३१ षट्कातच भारतीय विजय साकार झाला.

वेबदुनिया वर वाचा