भारताचा इंग्लंडसमोर ३०० धावांचा डोंगर

शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2011 (18:44 IST)
हैद्राबाद येथील संथ खेळपट्टीवर धिम्या सुरूवातीनंतर भारताने कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैनाच्या ६० चेंडूत ७२ आणि धोनी व रविंद्र जडेजाच्या ४३ चेंडूत ६५ धावांच्या भागीदारीच्या बळावर भारताने इंग्लंडसमोर ३०१ धावांचे लक्ष ठेवले.

इंग्लंडमध्ये दमदार सलामी देऊन भारतीय संघात जान फुकणारी अजिंक्य रहाणे आणि पार्थीव पटेल यांची सलामी जोडी आज अपयशी ठरली. पटेल नॉक स्ट्राईक बाजूवर दुदैवीरित्या धावबाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या अवघी १७ होती. अजिंक्य रहाणेने धीमा खेळ करत स्थिरावण्याचा प्रयत्न केला मात्र जास्त चेंडू खेळल्या गेल्याने तो मानसिक तणावात आला आणि नैसर्गिक खेळ करू शकला नाही. तो १५ धावांवर यष्टिचित झाला.

तिसर्‍या क्रमांकावर आलेला गौतम गंभीर चांगल्या लयीत दिसला. त्याने ३२ धावांची आत्मविश्वासपूर्वक खेळी केली मात्र डर्नबेकच्या चेंडूवर क्रॉस खेळणे त्यास महागात पडले. तो पायचित झाला. यानंतर विराट कोहलीने ३७ धावांची खेळी करत भारतीय डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

रैना खेळपट्टीवर आल्यानंतर त्याने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत धावफलक सतत हलता ठेवला. त्याने ५५ चेंडूत ६१ धावांची दमदार खेळी केली आणि भारतावरील दबाव इंग्लंडवर टाकून सन्मानजनक धावसंख्येकडे भारताची आगेकूच कायम राखली. धोनीने कर्णधारास साजेशी नाबाद ८७ महत्त्वपूर्ण खेळी केली आणि भारताचे आव्हान कायम ठेवण्याची दिशेने संघाने मार्गाक्रमण सुरळीत पार पाडले.

इंग्लंडला मात द्यायची झाल्यास मालिकेत सुरूवात विजयाने करण्यासोबतच त्यांच्यावर धाक निर्माण करावा लागेल. येथील राजीय गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावरील संथ खेळपट्टीवर भारताने उभारलेला ३०० धावांचा डोंगर सर करताना इंग्लंडची दाणादाण उडेल. भारतीय फलंदाजांनी आपली भूमिका चोख पार पाडली आता क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांनी लगाम कसला की विजय आपलाच समजा. आणि यासोबतच विजयी श्रीगणेशाही!

वेबदुनिया वर वाचा