टीम इंडियाचा बांगलादेशवर सात गडी राखून विजय

सोमवार, 16 जून 2014 (10:49 IST)
रॉबिन उथप्पा (50) आणि अजिंक्य रहाणे (64) या सलामीवीरांच्या अर्धशतकांच्या बळावर टीम इंडियाने  यजमान बांगलादेशला सात गडी राखून विजय मिळवला. या विजयासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने   1-0 ची आघाडी घेतली आहे.

बांगलादेशने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 272 धावा केल्या होत्या. भारताने त्याला चोख प्रत्युत्तर देत 16.4  षटकांत एक गडी गमावून 100 धावा काढल्या. मात्र, अचानक पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबवण्यात आला.  त्यानंतर भारताला डकवर्थ लुइसच्या नियमानुसार 26 षटकांत 150 धावांचे लक्ष्य देण्यात आले. भारताने 24.5  षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 153 धावा काढून विजय पटकावला.

तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार मुशफिकूर रहीम (59), शाकीब (52), महमुदुल्ला (41) यांनी केलेल्या  चमकदार खेळीने बांगलादेशने भारतासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

उथप्पाने 44 चेंडूंत 3 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 50 धावा काढल्या. रहाणेने 70 चेंडूंत 5 चौकार व 2  षटकारांच्या मदतीने 64 धावा ठोकल्या. अंबाती रायडू (16) आणि कर्णधार सुरेश रैना (15) नाबाद ठरले.  रॉबिन उथप्पा याने तब्बल सहा वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. 

वेबदुनिया वर वाचा