आज राजस्थान - पंजाब संघात झुंज

शुक्रवार, 10 एप्रिल 2015 (11:37 IST)
गतवर्षी आयपीएल स्पध्रेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा यंदाच्या स्पध्रेतील पहिला सामना राजस्थान रॉयल्सशी होईल. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर हा सामना शुक्रवारी खेळला जाईल.किंग्ज इलेव्हन पंजाबच्या पहिल्या सामन्यापूर्वीच या संघाचे खेळाडू एका विचित्र अडचणीत आले आहेत. अखेरच्या क्षणी या संघाने निरोध तयार करणार्‍या कंपनीशी करार केल्यामुळे कर्णधार जॉर्ज बेलीच्या खेळाडूंच्या जर्सीच्या पाठीमागे या कंपनीचा लोगो असेल. यासह इतर प्रायोजकांचे लोगोही असतील. जेव्हा निरोध कंपनीचा लोगो असलेल्या जर्सी खेळाडूंना देण्यात आल्या तेव्हा जर्सीची मागील बाजू पाहून ते गोंधळून गेले. एका खेळाडूने आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले, या जर्सी घालून जर मी खेळलो तर माझ्या कुटुंबीयांची स्थिती काय होईल, या कल्पनेनेच मी अस्वस्थ झालो आहे. याशिवाय माझे मित्रही माझी टिंगल उडवतील, यात शंकाच नाही. आयपीएलच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष राजीव शुक्लांनी आपली बाजू मांडताना सांगितले, निरोधच्या जाहिराती सामन्यादरम्यान दाखवल्या जातात. पण प्रायोजक म्हणून त्यांना स्वीकारण्यासंबंधी आमच्याकडे कोणतेही नियम नाहीत.२00८ साली ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने पहिले विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला, पण त्यानंतर मात्र तशी किमया त्यांना अद्यापही करता आलेली नाही. याउलट सिनेतारका प्रीती झिंटाच्या मालकीच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने गतवर्षी दिमाखदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पण त्यांना कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज बेलीचे नेतृत्व आणि कसोटीपटू संजय बांगर याच्या मार्गदर्शनाखाली किंग्ज इलेव्हन पंजाबने संयुक्त अरब अमिरातमधील सर्व सामने जिंकण्याचा पराक्रम गतवर्षी केला. मायकल क्लार्क तंदुरुस्त झाल्यामुळे विश्‍वचषक स्पध्रेत जॉर्ज बेलीला ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करता आले नाही आणि त्याला संघात स्थानही मिळू शकले नाही. राहुल द्रविडने ट्वेण्टी-२0 क्रिकेटमधून नवृत्ती स्वीकारल्यामुळे आता राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदी शेन वॉटसनची निवड झाली आहे. विश्‍वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघातील दोन खेळाडू कर्णधार म्हणून शुक्रवारी एकमेकांसमोर उभे ठाकतील. या दोन संघांत ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाच भरणा जास्त आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघात जॉर्ज बेलीसह मिचेल जॉन्सन, शॉन मार्श तसेच फटकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हे आहेत, तर राजस्थान रॉयल्स संघात शेन वॉटसन, स्टीवन स्मिथ आणि जेम्स फॉकनर हे खेळाडू आहेत. हे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या विश्‍वचषक विजेत्या संघात असल्यामुळे शुक्रवारचा सामना रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. ग्लेन मॅक्सवेलने गतवर्षी आपला करिष्मा दाखवला होता. गेल्या महिन्यातील विश्‍वचषक स्पध्रेतही त्याने आपला ठसा उमटवला. अखेरच्या षटकात चौकार आणि षटकारांची उधळण करत तो सामन्याचे पारडे स्वत:च्या किंग इलेव्हन पंजाब संघाच्या बाजूने फिरवू शकतो. डेव्हिड मिलरही धावांचा पाऊस पाडू शकतो. यंदा या संघाने वीरेंद्र सेहवागला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे फटकेबाज फलंदाजांची संख्या एकने वाढली आहे. याशिवाय नव्यानेच संघात प्रवेश केलेला मुरली विजय एक बाजू लढवू शकेल. 
 
राजस्थान रॉयल्सची फलंदाजीची मदार शेन वॉटसन, अजिंक्य रहाणे आणि स्टीवन स्मिथवर असेल. स्टीवन स्मिथने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केल्यावर विश्‍वचषक स्पर्धाही गाजवली. शेन वॉटसनच्या फलंदाजीचा क्रमांक बदलण्यात आल्यावर त्यालाही सूर गवसला. मधल्या फळीत संजू सॅमसन, जेम्स फॉकनर, स्ट्युअर्ट बिन्नी धावा वाढवू शकतील. किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रमुख गोलंदाज मिचेल जॉन्सन असून नवोदित अक्षर पटेल त्याला फिरकीची साथ देईल. याखेरीज विश्‍वचषक स्पध्रेत भेदक गोलंदाजी करणारा टिम साऊथीही आपला प्रभाव पाडू शकेल. 

वेबदुनिया वर वाचा