बाळूमामा आणि काळूबाईसारख्या धार्मिक-अध्यात्मिक मालिकांचा ट्रेंड का वाढतोय?
शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (20:57 IST)
अमृता कदम
'अगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी....बोल अहंकारा, सदानंदाचा येळकोट' हे गाणं ऐकू आलं की, घड्याळही न पाहता सात वाजले हे कळायचं. सात ते साडेसात या वेळेत शक्यतो घरी फोन करायचाच नाही, कारण तेव्हा सगळेजण 'जय मल्हार' पाहत असणार हे माहितीच असायचं. अनेक घरांमध्ये हे चित्र होतं. गावाकडे लोक आता खंडोबाची मालिका लागेल असं म्हणून गडबडीनं टीव्ही सुरू करायचे.
झी मराठी चॅनेलवर साधारण सात वर्षांपूर्वी 'जय मल्हार' ही मालिका सुरू झाली होती. तोपर्यंत रामायण, महाभारत, कृष्णलीला किंवा हनुमान-शंकराच्याच गोष्टी सीरिअलमधून पाहिल्या होत्या, त्याही प्रामुख्याने हिंदी चॅनेलवर.
महाराष्ट्रातले बहुसंख्य लोक ज्या देवाला मानतात, त्याची गोष्ट मालिकेच्या माध्यमातून समोर येण्याची कदाचित ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर आजपर्यंत वेगवेगळ्या चॅनेल्सवर धार्मिक-आध्यात्मिक विषयांवरच्या वेगवेगळ्या मालिका सुरू झाल्याचं चित्र दिसतं.
मराठी लोकांची जी काही श्रद्धास्थानं आहेत, अशा देवतांच्या गोष्टी दाखवल्या जाऊ लागल्या. महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, आध्यात्मिक जडणघडणीत ज्यांचं योगदान आहे, अशा संतांची चरित्रंही मालिकांमधून पाहायला मिळाली.
विठू माऊली, दख्खनचा राजा ज्योतिबा, आई माझी काळूबाई, श्री गुरुदेव दत्त, तू माझा सांगाती, कृपासिंधू, ब्रह्मांडनायक अशा मालिका वेगवेगळ्या वाहिन्यांवरून प्रक्षेपित झाल्या.
सध्याच्या घडीलाही झी मराठी, कलर्स मराठी, सोनी मराठी, स्टार प्रवाहसारख्या वाहिन्यांवर घेतला वसा टाकू नको, जय जय स्वामी समर्थ, बाळू मामाच्या नावानं चांगभलं, गाथा नवनाथांची, ज्ञानेश्वर माऊली अशा धार्मिक-आध्यात्मिक मालिका सुरू आहेत. या मालिकांना प्रेक्षकांची पसंतीही मिळत आहे. केवळ मराठीच नाही, हिंदी वाहिन्यांवरही अशा मालिकांचा ठराविक प्रेक्षकवर्ग आहे.
सध्या मराठी वाहिन्यांवर या मालिकांचा ट्रेंड का वाढतो आहे? या मालिकांचा टार्गेट ऑडिअन्स नेमका कोण असतो? या मालिकांमागची व्यावसायिक गणितं काय असतात? अशा मालिका जेव्हा केल्या जातात तेव्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातला समतोल सांभाळणं किती आवश्यक आहे आणि खरंच तो तसा सांभाळला जातो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.
'आपल्या आध्यात्मिक परंपरेतील गोष्टी सांगण्याकडे वाढता कल'
मराठीतल्या मनोरंजन वाहिन्यांवरील धार्मिक मालिकांच्या वाढत्या ट्रेंडबद्दल निर्माते आणि लेखक सुबोध खानोलकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की,
"महाराष्ट्राला हजारो वर्षांपासूनची भक्ती परंपरा आहे. आपल्याकडे कोणत्या तरी संप्रदायाला मानणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. अशावेळी मनोरंजनासोबतच लोक ज्यांना मानतात अशा लोकांची चरित्रंही मालिकांच्या माध्यमातून त्यांना पाहायला मिळतात.
टीव्हीवर रामायण, महाभारतासारख्या मालिकांमधून राम, कृष्ण, हनुमान या देवांच्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. मग आता आपल्या मातीतल्या संतांच्या किंवा ज्या देवी-देवतांना आपण मानतो त्यांच्या गोष्टी सांगण्याकडे कल वाढू लागला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात देवांच्या-संतांच्या खूप गोष्टी प्रचलित आहेत, त्या आता मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत."
"टेलिव्हिजन हे प्रेक्षकाभिमुख माध्यम आहे. जे लोकांना आवडतं, तेच तयार होतं. अगदी सुरुवातीला जय मल्हार, तू माझा सांगाती अशा मालिका यशस्वी झाल्या. त्यानंतर लक्षात आलं की, या कन्टेन्टला मागणी आहे आणि प्रत्येकच चॅनेलवर अशा मालिका सुरू झाल्या. सगळ्यांनीच हा सक्सेस फॉर्म्युला रिपीट केला आणि प्रत्येकालाच यश मिळत गेलं," असं मत जय जय स्वामी समर्थ, कृपासिंधू, ब्रह्मांडनायक, तू माझा सांगाती, आई माझी काळूबाई, मेरे साई यांसारख्या मालिकांचे लेखर शिरीष लाटकर यांनी व्यक्त केलं
अशाप्रकारच्या मालिका एकापाठोपाठ एक येण्याचं कारण अधिक स्पष्ट करून सांगताना शिरीष लाटकर यांनी म्हटलं, "रामायण, महाभारत, गजानन महाराज किंवा साईबाबा यांच्यावरच्या अनेक मालिका येऊन गेल्या आहेत. महाराष्ट्रात प्रत्येक जाती किंवा समाजानुरुप विशिष्ट देवांना मानणारा एक वर्ग आहे. तसंच वेगवेगळ्या भागांमध्येही विशिष्ट देवतांना मानणारा एक वर्ग आहे.
म्हणजे कोल्हापूर भागात अंबाबाई, ज्योतिबाच्या भाविकांची संख्या जास्त असेल. नाशिक- उत्तर महाराष्ट्रात सप्तशृंगीला खूप मानतात. अशावेळी वाहिन्यांना जाणवलं की, या देवी-देवतांच्या किंवा या भागातील संताच्या गोष्टी समोर आल्या तर त्याला एक ठराविक प्रेक्षकवर्ग तर हमखास मिळेल.
"पूर्वी असं असायचं की, अशा मालिकांमधील मुख्य व्यक्तिरेखा ही सर्वांना माहीत असलेली हवी, अशी काहीशी धारणा होती. पण गेल्या काही वर्षांत हे चित्र बदललं. मी 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेचंच उदाहरण देतो.
"पश्चिम महाराष्ट्रातला एक ठराविक पट्टा सोडला, तर त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात फार माहिती नव्हती. अनेकांनी त्यामुळेच हा विषय चालेल का असा मुद्दाही उपस्थित केला. पण मालिका विश्वातल्या लोकांना विश्वास होता आणि या मालिकेच्या लोकप्रियतेनं ते सिद्ध केलं.
याचं मुख्य कारण म्हणजे नवीन विषयांची चॅनेल्सना गरज असते. एक विशिष्ट् टार्गेट ऑडिअन्स असतो, जो या मालिकांच्या निमित्ताने जोडला जातो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपण संतांची चरित्रं पाहिली, तर त्यात खूप नाट्यमयता आहे. ही नाट्यमयता प्रेक्षकांना भावते," असंही शिरीष लाटकर यांनी म्हटलं.
'प्रेक्षकांना मिळते सकारात्मकता आणि आशा'
व्यावसायिक स्पर्धेतून यशाचा फॉर्म्युला पुन्हा पुन्हा अजमावून पाहण्याची गरज असेल किंवा एका ठराविक प्रकारच्या कन्टेन्टला असलेली मागणी यातून चॅनेल्स धार्मिक-आध्यात्मिक मालिकांकडे वळत आहेत खरी.
पण या मालिकांचा जो प्रेक्षकवर्ग आहे, तो या मालिकांसोबत मुळात कसा कनेक्ट होतो? 'पुराणातली वानगी' किंवा दैवी शक्ती, चमत्काराच्या गोष्टी यापलिकडे जाऊन प्रेक्षक अशा मालिकांच्या कथानकाशी स्वतःला कसे रिलेट करतात? हेही प्रश्न आहेतच.
कारण एका ठराविक साच्यातल्या मालिका सातत्यानं पाहिल्या जात असतील तर प्रेक्षकांची या विषयांकडे पाहण्याची मानसिकता नेमकी काय असते, हे समजून घेणंही गरजेचं आहे.
सुबोध यांनी याबद्दल सांगताना म्हटलं की, "लेखक म्हणून मला या मालिकांबद्दल अजून एक गोष्ट जाणवते. आपलं आयुष्य धावपळीचं झालं आहे, अनेक समस्या वाढल्या आहेत. अशावेळी या धार्मिक-आध्यात्मिक मालिकांमधून सगळं चांगलं होईल ही आशा मिळत असेल, सकारात्मकता मिळत असेल तर लोक अशा गोष्टी आवर्जून पाहतात. फक्त मेकर म्हणून तुमचा तुमच्या संकल्पनेवर खूप दृढ विश्वास असायला हवा..."
शिरीष लाटकर यांनी म्हटलं की, माणसाला जगण्यासाठी आशा या एका गोष्टीची खूप गरज असते. धार्मिक, आध्यात्मिक मालिका ही आशा देतात, असं मला वाटतं.
सध्या आयुष्य बदललं आहे, स्ट्रेस वाढला आहे. आव्हानं आहेत, स्वतःला सिद्ध करण्याची स्पर्धा आहे. या सगळ्यामध्ये जेव्हा मानसिक कुचंबणा व्हायला लागते, सगळे रस्ते बंद झाले आहेत असं वाटतं तेव्हा एकच आशा असते, ती म्हणजे देव, लाटकर पुढे सांगतात.
"आयुष्यात प्रचंड कष्ट सहन केलेल्या आणि मग देवाच्या किंवा संतांच्या कृपेनं त्या कष्टांचं फळ मिळालेल्या एखाद्या भक्ताची गोष्ट जेव्हा लोक पाहतात, तेव्हा त्यांना मी श्रद्धेनं डोकं ठेवू शकतो अशी एक जागा आहे, ही आशा मिळते.
प्रेक्षक त्या भक्तामध्ये स्वतःला पाहतात. त्यामुळेच सातत्याने या मालिका तयार होत आहेत आणि त्या यशस्वीही होत आहेत. या मालिकांमधून लोकांना तीन गोष्टी मिळतात असं मला वाटतं- आशावादी दृष्टिकोन, मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा."
काय आहेत व्यावसायिक गणितं?
प्रेक्षकांचा प्रतिसाद हा एक भाग झाला. पण अशा मालिका आणताना एखादी वाहिनी नेमका काय विचार करते? या मालिकांमागचं व्यावसायिक गणित काय असतं? हे समजून घेताना आधी काही तांत्रिक गोष्टी समजून घेऊ.
2014 मध्ये टेलिव्हिजन ऑडिअन्स मेजरमेंटची (TAM) जागा BARC या यंत्रणेनं घेतली. प्रेक्षकांची संख्या, त्यांचा कल यांचा आढावा घेणारी यंत्रणा असं ढोबळमानानं BARC चं वर्णन करता येईल.
TAM चं वेटेज हे मुख्यतः पुणे-मुंबई आणि मोठ्या शहरांनाच होतं. BARC नं हे चित्र बदललं. 2015 पासून BARC नं ग्रामीण आणि निमशहरी प्रेक्षकांचीही गणना सुरू केली.
त्यामुळे पूर्वी फक्त पुण्या-मुंबईचा विचार करणाऱ्या वाहिन्यांसाठी अचानक गाव-तालुके महत्त्वाचे होऊन बसले. माळरानावरच्या लोकांच्या आवडी-निवडींनाही किंमत मिळाली.
त्यावेळी या भागातील प्रेक्षकांचा विचार करायला चॅनल्सनं सुरुवात केली. त्यातून या भागातील लोकांच्या भावविश्वाशी रिलेट करणारे विषय समोर यायला लागले.
जसजसे नवे चॅनल्स येत आहेत, तसतशी स्पर्धा वाढतेय आणि नवनव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची चढाओढ कंटेटमध्ये बदल घडवतेय.
त्याबद्दल बोलताना सुबोध खानोलकर यांनी म्हटलं की, पूर्वी शहरी भागात टेलिव्हिजन, सॅटेलाइट चॅनेल्स पाहणाऱ्यांची संख्या अधिक होती. पण तंत्रज्ञान जसजसं सुलभ होत गेलं, तसं ग्रामीण भागातही टेलिव्हिजन, मनोरंजन वाहिन्यांचं जाळं पसरत गेलं. त्यामुळे ग्रामीण प्रेक्षकांचाही विचार व्हायला लागला. त्या प्रेक्षकांच्या आयुष्याचा भाग असलेल्या गोष्टी दाखवायला सुरुवात झाली.