‘बालभारती’हा पहिला मराठी चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (18:41 IST)
बालिका वधू, पेशवा बाजीराव, पंड्या स्टोर, सरस्वती चंद्र आणि यांसारख्या अनेक गाजलेल्या, विक्रम प्रस्थापित केलेल्या आणि पुरस्कार विजेत्या मालिकांचे निर्माते आता मराठी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. ‘बालभारती’हा त्यांचा पहिलाच चित्रपट चंदेरी पडद्यावर लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबद्दल आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे कारण त्याची आगळी-वेगळी कथा, हलकी फुलकी मनोरंजक मांडणी आणि त्यात भूमिका असलेले आजचे लोकप्रिय कलाकार. या चित्रपटाची निर्मिती ‘स्फियरओरिजीन्स मल्टीव्हिजन प्रायव्हेट लिमिटेड’ची असून या कंपनीचे संस्थापक संजोय आणि कोमल वाधवा हे आहेत.  
 
बालभारती ची संकल्पना नाविन्य पूर्ण आणि रंजक तर आहेच पण चित्रपट त्या पलीकडे जाऊन मराठी हृदयाला ही भिडतो. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणारा एक कल्पक मुलगा आणि  त्याच्या भविष्याबद्दल कळकळ असणारे आईवडील यांची ही कथा. पण जेव्हा वडील ठरवतात  की इंग्रजी येणे हेच बुद्धिमत्तेचे एकमेव परिमाण आहे आणि इंग्रजी आलेच पाहिजे तेव्हा गोष्टी रंजक होतात. प्रेक्षकांना त्यांचा आवडता अभिनेता सिद्धार्थ जाधव याला हटके भूमिकेत बघायला नक्की आवडेल. नंदिता ने जागरूक आई ऊतम साकारली आहे.     
 
विनोदाची हलकी झालर असलेल्या या चित्रपटात अभिजित खांडकेकर ची याची महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नितीन नंदन यांनी केले आहे. नंदन यांच्या आधीच्या  ‘झिंग चिक झिंग’या मराठी चित्रपटाने अनेक प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले असून तो इंडियन पॅनोरमामध्ये ही निवडला गेला होता. 
 
 स्फियरओरिजीन्स  मल्टीव्हिजन’ही टेलिव्हिजन क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. २००२ साली स्थापना झाल्यापासून कंपनीने अनेक मालिकांची निर्मिती केली आणि ‘बालिका वधू’साठी लिम्का वर्ल्ड बुकमध्ये  विक्रम नोंदविला. बालविवाहावर बेतलेल्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या टीव्ही मालिकेचे २२४५ भाग झाले आणि ती आठ वर्षे चालली. ‘स्फियरओरिजीन्स  मल्टीव्हिजन’ने आत्तापर्यंत ७५०० तास मनोरंजन कॉन्टेंटची निर्मिती केली आहे.    
 
 बालभारती बद्दल बोलताना ‘स्फियरओरिजीन्स’’चे संस्थापक संजोय वाधवा म्हणाले, “पहिल्या-वहिल्या ‘बालभारती’या चित्रपटाच्या माध्यमातून प्रतिभावान अशा मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही एका मराठी कुटुंबाची कथा तर आहेच पण त्याच बरोबर ही मराठी माध्यमाच्या शाळेची कथाही आहे. बदलत्या काळाबरोबर राहण्यासाठी स्वतःमध्ये ही शाळा कसे परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प करते हे बघणे नक्कीच प्रेरणादायी आहे. एक सामाजिक संदेश दिला जात असतांनाच चित्रपटाच्या मनोरंजन मूल्यांशी कोणतीही तडजोड केली जात नाही. ‘आपल्या प्रेक्षकांना अभूतपूर्व पद्धतीने हलवून टाकण्याचे’आमचे जे ब्रीद आहे तीच परंपरा हा चित्रपट कायम ठेवतो आणि प्रत्येक बाबतीत उच्च दर्जा राखतो. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार, लेखक-दिग्दर्शक तसेच आघाडीचे तंत्रज्ञ या चित्रपटाशी जोडले गेले आहेत.”

‘स्फियरओरिजीन्स’च्या सह-संस्थापिका कोमल म्हणाल्या, “बालभारती’ची संकल्पनाच अनोखी असल्याने तो प्रेक्षक डोक्यावर घेतील याबद्दल आम्हाला खात्री आहे. आम्ही उत्तम व दर्जेदार कथा आणि उच्च निर्मितीमूल्ये असलेल्या चित्रपटांची निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत.”
 
 बालभारती चित्रपट मराठी संस्कृती, भाषा आणि शिक्षण या अगदी जिव्हाळ्याचा मुद्द्यांना एकत्र जोडतो. गमतीदार हलक्याफुलकी कथा बघताना आपलेपणाची भावना तयार होते म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी हृदयांला चित्रपट भावणार आणि बालभारतीशी प्रेक्षकांची नाळ लगेच जुळेल असा विश्वास सर्वांना आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती