उज्ज्वल धनगर हा शहापूर तालुक्यातील सापगावचा रहिवासी होता. गेल्या 15 वर्षांपासून तो टिटवाळ्यात राहत होता. उज्ज्वलने स्वराज्यरक्षक संभाजीसोबतच स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतही खाशाबाची व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय क्राईम पेट्रोल, लक्ष्य यासारख्या मालिकांमध्येही त्याने काम केले होते. अनेक कार्यक्रमांचे निवेदनही त्याने केले आहे. उज्ज्वलच्या अकाली निधनाने सहकलाकारांवर शोककळा पसरली आहे.
छातीदुखीच्या त्रासानंतर रुग्णालयात
क्राईम पेट्रोल या हिंदी मालिकेचे शूटिंग उज्ज्वलने शनिवारी पूर्ण केले होते. रविवारी रात्री त्याने नगरसेवक संतोष तरे आणि समाजसेवक महेश ऐगडे यांच्यासोबत जेवणही घेतले होते. मात्र सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या छाती आणि पोटात दुखायला लागले. त्यामुळे तो टिटवाळा येथील महागणपती रुग्णालयात दाखल झाला. अॅसिडिटीच्या शक्यतेमुळे औषध घेऊन तो घरी परतला. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने तो रुग्णालयात गेला. परंतु उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. टिटवाळा स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंकार करण्यात आले.