मकरंद करणार मराठी रंगभूमीवर अभिनयाचा श्रीगणेशा

शनिवार, 14 डिसेंबर 2019 (10:43 IST)
रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरचा अवलिया कलाकार म्हणून मकरंद देशपांडे ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत अभिनयात मोजक्याच तरीही लक्षवेधक, हटके आणि महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. जवळपास ५० पेक्षा जास्त हिंदी नाटके लिहणारे मकरंद देशपांडे आता मराठी रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'सर, प्रेमाचं काय करायचं!' या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मकरंद देशपांडे मराठी रंगभूमीवर अभिनय करताना दिसणार आहेत. आजवर अनेक मराठी नाटकांसाठी लेखन केल्यानंतर 'सर, प्रेमाचं काय करायचं!' या नाटकात मकरंद मुख्य भूमिका साकारणार आहेत. नाटकाच्या नावावरून हे नाटक 'प्रेम' या भावनेवर असणार हे नक्की. " प्रेम आपल्याला शिकवले जाऊ शकत नाही, प्रेम अगदी सहजच होते, प्रेम विसरता येणे सोपे नसते, प्रेम आपल्यासाठी उपयुक्त सुद्धा असते!! असे हे प्रेम एका विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकावर केले तर काय होईल? याच प्रश्नाचे उत्तर 'सर, प्रेमाचं काय करायचं!' नाटक पाहिल्यावर आपल्याला मिळणार आहे.
 
आपल्या पहिल्या मराठी नाटकाच्या अनुभवाबद्दल मकरंद सांगतात, " मी अभिनयाची सुरुवात आंतरमहाविद्यालयीन रंगभूमीवरून केली. त्यानंतर ३० वर्ष मी हिंदी नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती करत त्या नाटकांमध्ये अभिनयही केला. यासर्व हिंदी नाटकांचे गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कलकत्ता, दिल्ली आदी राज्यांमध्ये प्रयोग केले. प्रयोगांच्या निमित्ताने संपूर्ण भारत देश पालथा घातला. मात्र आता मला असे वाटले की, मला माझ्या मातृभाषेतील नाटकात अभिनय करायचा आहे. मी अभिनय करत असलेल्या पहिल्या मराठी नाटकाचे प्रयोग मला संपूर्ण महाराष्ट्रात करायचे आहेत. याच अट्टाहासाने मी माझे आवडते नाटक, माझे आवडते कलाकार, तंत्रज्ञांसोबत माझ्या मायबाप प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे 'सर, प्रेमाचं काय करायचं!'. माझ्या हिंदी नाटक, चित्रपटांवर प्रेक्षकांनी जसे भरघोस प्रेम केले तसेच प्रेम माझ्या मराठी नाटकावर देखील करणार याची मला खात्री आहे."
 
मकरंद देशपांडे नाटकवाला आणि व्ही.आर. प्रोडक्शन सादर करत असलेल्या  'सर, प्रेमाचं काय करायचं!'. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन मकरंद देशपांडे यांनी केले आहे. या नाटकात मकरंद देशपांडे यांच्यासोबत अजय कांबळे, आकांक्षा गाडे, माधुरी गवळी, निनाद लिमये, अनिकेत भोईर दिसणार आहे. 'सर, प्रेमाचं काय करायचं!' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या १९ डिसेंबर २०१९ रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे. तर दुसरा प्रयोग २१ डिसेंबरला मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिर येथे दुपारी ४ वाजता होणार आहे.
 
या नाटकासाठी अमोघ फडके यांनी प्रकाशयोजना पाहिली असून शैलेंद्र बर्वे यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. तर टेडी मौर्य यांनी नेपथ्य पाहिले आहे. या नाटकाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत राजीव देशपांडे दिसणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती