कोकणातील 'शिमगा' हा सण प्रत्येक कोकणी माणसासोबतच मुंबई, पुण्यातील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा आणि चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. होळी या सणाला कोकणात 'शिमगा' म्हणतात. वर्षभर महाराष्ट्रातील सर्व चाकरमानी, मानकरी लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. कोकणात होळी हा सण साजरी करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. शिवाय वेगवेगळ्या परंपरा देखील आहेत. यात एक महत्त्वाची परंपरा आहे आणि ती म्हणजे 'उत्सवाची पालखी'. होळी सणात गावाच्या ग्रामदेवतेची पारंपरिक वाद्य वाजवून पालखी काढली जाते आणि ती नाचवली जाते. या पालखीत देव देवळातून पालखीत विराजमान होतात आणि भक्तांना दर्शन द्यायला निघतात. कोकणात अतिशय प्रसिद्ध असलेला हा पालखीचा अभूतपूर्ण सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशविदेशातून लोक कोकणात येतात. शिवाय सैन्यात असलेले आपले जवान देखील पालखी नाचवायला आवर्जून कोकणात येतात.