'प्लॅनेट मराठी'च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून शरद पोंक्षे यांचे वेबसिरीजमध्ये पदार्पण

बुधवार, 17 मार्च 2021 (10:56 IST)
प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना दर्जेदार आणि आशयपूर्ण कार्यक्रम देण्याची हमी देणाऱ्या प्लॅनेट मराठी या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आणखी एका नवीन वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा आज मुंबईत शुभारंभ झाला. यापूर्वीच प्लॅनेट मराठीच्या काही वेबसिरीजची नावे घोषित करण्यात आली होती त्यात आता आणखी एका वेबसिरीजची भर पडणार आहे. मात्र या वेबसिरीजचे नाव सध्या तरी गुलदस्त्यात आहे. असे असले तरी यातील कलाकारांची नावे मात्र जाहीर करण्यात आली आहेत. शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, तेजस बर्वे, पर्ण पेठे, उदय नेने अशी दमदार स्टारकास्ट असलेली ही वेबसिरीज कौटुंबिक आणि विनोदी स्वरूपाची असणार आहे.
 
सहा भागांची ही वेबसिरीज एक कौटुंबिक कथा असून ही वेबसिरीज बघताना हे कुठेतरी आपल्याही घरात घडतंय, याची प्रेक्षकांशी जाणीव होईल आणि त्यामुळेच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. या वेबसिरीजच्या निमित्ताने शरद पोंक्षे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत.
 
या वेबसिरीजबद्दल प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''आजवर हाताळलेल्या विषयांपेक्षा हा जरा वेगळाच विषय आहे. ही वेबसिरीज प्रेक्षक आपल्या आयुष्याशी कुठेतरी जोडू शकतात. ही सिरीज ज्या विषयावर आधारित आहे, तो विषय खरोखरच गंभीर होता. मात्र तरीही आम्ही या गंभीर विषयाला विनोदाची जोड देत, अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने हा विषय मांडला आहे. अभिनयात पूर्ण मुरलेले कलाकार असल्याने या सर्व जणांनी आपापल्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे.''
 
वर्जिनोशन्सची प्रथम निर्मिती असणाऱ्या या वेबसिरीजचे दिग्दर्शन अमित कान्हेरे यांचे असून योगेश विनायक जोशी यांनी संवादलेखन केले आहे. तर प्रतीक व्यास, अमित कान्हेरे यांनी निर्मिती केली आहे. विशाल संगवई डीओपीचे काम पाहिले असून ओंकार महाजन क्रिएटीव्ह प्रोड्युसर आहेत. रोहन-रोहन यांनी या वेबसिरिजला संगीत दिले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती