‘प्लॅनेट मराठी’च्या ‘तमाशा लाईव्ह' चित्रीकरणाचा श्रीगणेशा

शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (23:56 IST)
हळूहळू आता सर्वत्र सुरळीत होत असतानाच सिनेसृष्टीही पूर्वपदावर येऊ लागली आहे. अनेक मोठमोठ्या चित्रपटाच्या घोषणा होत असतानाच काही दिवसांपूर्वीच प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि एस. एन. प्रॉडक्शन सहनिर्मित 'तमाशा लाईव्ह' या बिग बॅनर चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. पोस्टरवरूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली होती. संजय जाधव दिग्दर्शित आणि सचित पाटील, सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. दिवाळी २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'तमाशा लाईव्ह'ची अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग यांनी निर्मिती केली आहे तर सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सचित पाटील निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. या संगीतमय चित्रपटाला अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभले असून क्षितिज पटवर्धन यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत. या चित्रपटात सुमारे तीस गाणी आहेत. मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.
 
'तमाशा लाईव्ह'विषयी दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, '' सोनाली आणि माझी सुरुवातीपासूनच मैत्री असल्याने त्याचा फायदा आम्हाला काम करतानाही होत आहे. मुळात सोनाली एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्या कामाबद्दल मला अधिक काही सांगायची गरजच नाही. सचित पाटीलचा अभिनयही आपण सर्वांनीच पाहिला आहे. प्रथमच तो निर्मात्याची धुराही सांभाळणार आहे आणि  'प्लॅनेट मराठी'सोबत हा माझा दुसरा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे साहजिकच मी खूप खूष आहे. एकंदरच 'तमाशा लाईव्ह'साठी मी खूपच उत्सुक आहे.''
 
निर्मिती क्षेत्रातील पदार्पणाविषयी सचित पाटील म्हणतो, ''आजवर मी पडद्यावर अनेक भूमिका केल्या यावेळी पहिल्यांदाच पडद्यासोबतच पडद्यामागची निर्मात्याची भूमिकाही साकारणार आहे. मला खूप आनंद आहे की, 'तमाशा लाईव्ह'च्या निमित्ताने मी संजय जाधव, अक्षय बर्दापूरकर आणि 'प्लॅनेट मराठी'च्या परिवाराशी जोडला जाणार आहे आणि या सगळ्यात माझा मित्र नितीन वैद्य मला साथ देत आहे. आमच्यासाठी हे स्वप्नवत आहे. कारण निर्मिती पदार्पणासाठी आम्ही एका चांगल्या चित्रपटाच्या शोधात होतो आणि ‘तमाशा लाईव्ह' सारखा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आम्हाला करायला मिळतोय.मला खात्री आहे हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.''
 
'तमाशा लाईव्ह'बद्दल 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''सध्या सर्वत्र गणेशोत्सव असल्याने या मंगलमयी दिवसांत 'तमाशा लाईव्ह'चे चित्रीकरण सुरु होत आहे. हा बाप्पाचा आशीर्वादच म्हणावा लागेल. मी संजय सोबत एक प्रोजेक्ट करत आहे आणि सोनाली सोबतही एक प्रोजेक्ट करत आहे. आता 'तमाशा लाईव्ह'च्या निमित्ताने आमच्या या परिवारात सचितचाही समावेश झाला आहे. त्यामुळे 'तमाशा लाईव्ह'मध्ये प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळेल. अशा प्रकारचा चित्रपट आम्हीही पहिल्यांदाच करत आहोत. त्यामुळे सगळ्यांसारखाच मीसुद्धा खूप उत्सुक आहे.''

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती