'हिलिंग इज ब्युटीफूल' या भावस्पर्शी वाक्यातच सारं काही सामावलं आहे. आपल्या दुःखावर हळुवार कोणी फुंकर मारली तर सगळंच सुरळीत, सुंदर होऊन जातं. आयुष्याकडे पाहण्याची एक नवीन दिशा मिळते. अशाच काहीशा आशयावर आधारित 'जून' ही वेबफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबफिल्मच्या प्रदर्शनाबाबत सर्वत्र चर्चा सुरु असतानाच आता प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी 'जून'मधील चार सुमधुर गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्यांना निखिल महाजन आणि जितेंद्र जोशी यांनी शब्दबद्ध केले असून आपल्या जादुई आवाजाने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या शाल्मली हिने या गाण्यांना संगीत दिले आहे. 'जून'च्या निमित्ताने शाल्मली संगीतकार म्हणून पदार्पण करत आहे. त्यामुळे अशी दमदार आणि सृजनशील टीम 'जून' ला लाभल्याने यंदा पावसाळ्यातील आल्हाददायी वातावरणाचा आनंद द्विगुणित होणार हे नक्की!
निखिल महाजन लिखित 'बाबा' या भावनिक गाण्याला शाल्मली, अभय जोधपूरकर यांचा आवाज लाभला असून 'बाबा' या रिप्राईस गाण्याला आनंदी जोशी हिने गायले आहे. 'हा वारा' हे प्रेरणादायी गाणे शाल्मली आणि जितेंद्र जोशी यांनी गायले असून 'पार गेली' या आनंददायी गाण्याला असीम धनेश्वर आणि नेहा तावडे यांनी स्वरबद्ध केले आहे. तर या दोन्ही गाण्यांचे बोल जितेंद्र जोशी यांचे आहेत. या सर्व गाण्यांना शाल्मली हिने संगीत दिले आहे. पहिल्यांदाच संगीतकार म्हणून आपल्या समोर आलेली शाल्मली आपल्या या नवीन प्रवासाबद्दल सांगते, ''प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली असून प्लॅनेट मराठी ओटीटीवर जून लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. यात मी एका वेगळ्या भुमिकेतून तुमच्या भेटीला येणार आहे. आजपर्यंत मी अनेक गाणी गायली आणि माझ्या या गाण्यांवर श्रोत्यांनी भरभरून प्रेम केले. मला आशा आहे, की प्रेक्षक मला संगीतकार म्हणूनही स्वीकारतील. त्यामुळे माझ्या या नवीन प्रवासाबाबत मी खूपच उत्सुक आहे. मुळात मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. त्यामुळेच 'जून' या वेबफिल्मच्या माध्यमातून मी संगीतकार म्हणून प्रथमच तुमच्यासमोर येत आहे. या प्रवासात खरंतर मला अनेकांची साथ लाभली आहे. विशेषतः निखिल महाजन आणि जितेंद्र जोशी यांची. त्यांच्या सुरेल शब्दांनी या गाण्यांना चारचाँद लावले आहेत. एकंदर ही संपूर्ण टीमच अफलातून आहे. यात वेगवेगळ्या मूडमधील गाणी असून मला खात्री आहे, 'जून'ची गाणी श्रोत्यांच्या नक्कीच पसंतीस उतरतील.''
'जून' वेबफिल्मच्या गाण्यांबाबत प्लॅनेट मराठी ओटीटी सीएमडी अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “या वेबफिल्मचा विषयच मुळात खूप भिन्न आहे. याविषयी मी अधिक सांगत नाही मात्र प्रेक्षकांना सकारात्मक दृष्टिकोन देणारी ही वेबफिल्म आहे. यातील गाणीही अतिशय श्रवणीय आहेत. निखिल महाजन, जितेंद्र जोशी, शाल्मली, यांच्यासह तगडी संगीत टीम 'जून'ला लाभली आहे. विशेष आनंद या गोष्टीचा आहे, की राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपर्यंत मजल मारणारी 'जून' ही वेबफिल्म आम्हाला प्रदर्शित करण्याची संधी मिळत आहे. प्लॅनेट मराठीची सुरुवात जून सारख्या जबरदस्त वेबफिल्मने होत आहे. यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. लवकरच जून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तत्पूर्वी या वेबफिल्ममधील गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.”
सुप्री मीडियाचे शार्दूल सिंग बायस, नेहा पेंडसे बायस आणि ब्लू ड्रॉप प्रा. लि. चे निखिल महाजन आणि पवन मालू निर्मित 'जून' या चित्रपटात नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन, निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.