काही महिन्यांपूर्वी 'बॅक टू स्कुल' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सोबतच या सिनेमाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले होते. मात्र सिनेमातील कलाकार, सिनेमाची कथा, प्रदर्शनाची तारीख याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती.
मात्र नुकताच या सिनेमाचा मुहूर्त सोहळा दिमाखात संपन्न झाला. मुंबईत झालेल्या या सोहळ्याला कलाकारांसोबतच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भैय्या भोसले आणि विद्यमान आमदार महेशदादा लांडगे तसेच नगरसेविका सोनाली गव्हाणे उपस्थित होते. या सिनेमाची वैशिष्ट्य म्हणजे सोनाली गव्हाणे, मेघराज भैय्या भोसले आणि महेशदादा लांडगे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
या सिनेमात सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण ( विश्वासराव ), सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी आणि ईशा आगरवाल आदी अनेक कलाकार भूमिका निभावताना दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने निशिगंधा वाड बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपटात दिसणार आहे.
सिनेमाचे पोस्टर आणि नावावरून हा सिनेमा नक्कीच शाळेच्या अविस्मरणीय आणि गोड आठवणींना उजाळा देणारा असणार हे तर नक्की. रंगसंस्कार प्रॉडक्शनच्या 'बॅक टू स्कुल' या सिनेमाचे दिग्दर्शन सतिश महादु फुगे यांनी केले असून पटकथा आणि लेखन अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे आहे. शुभांगी सतीश फुगे आणि सतिश महादु फुगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सहनिर्माता हनुमंत नाडेकर असून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुदर्शन रणदिवे, अमित बेंद्रे, अमृता पाटील, प्राची फुगे, अमृत झांबरे, किरण झांबरे, दिपक गडदे यांनी काम पहिले आहे. श्रीनिवास गायकवाड छायाचित्रण दिग्दर्शक केले आहे. रंगसंस्कार प्रोडक्शन हाऊसने यापूर्वी 'रामप्रहर' नावाचा सिनेमा केला असून तो २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.