'मेकअप'मधून नेहा कक्करचे मराठीत पदार्पण

मंगळवार, 28 जानेवारी 2020 (10:14 IST)
रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची प्रमुख भूमिका असलेला आणि गणेश पंडित लिखित दिग्दर्शित  'मेकअप' हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत.
 
'कसे निराळे हे करार प्रेमाचे' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'मिले हो तुम हमको' या गाण्याची मराठी आवृत्ती म्हणजे 'कसे निराळे हे करार प्रेमाचे' हे गाणे आहे. आतापर्यंत आपण अनेक मराठी गाण्यांच्या हिंदी व्हर्जनचा अनुभव घेतला आहे. मात्र या गाण्याच्या निमित्ताने आपण एका हिंदी गाण्याच्या मराठी व्हर्जनचा अनुभव घेणार आहोत. या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याच्या फिमेल व्हर्जनला नेहा कक्कर हिने आवाज दिला असून मेल व्हर्जन स्वप्नील बांदोडकरने गायले आहे. नेहाचे मराठीतील हे पहिलेच गाणे आहे. 
 
तिच्या या गाण्याच्या अनुभवाबद्दल नेहा सांगते, " 'मिले हो तुम हमको' हे गाणे माझ्यासाठी सर्वात जवळचे गाणे आहे. माझ्या भावाने म्हणजे टोनी कक्करने या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी अमाप प्रेम दिले. कदाचित म्हणूनच या गाण्याचे मराठी व्हर्जन 'मेकअप' या चित्रपटात करण्यात आले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेतल्या या गाण्याला माझाच आवाज असल्याने मी खूपच आनंदित आहे. माझी मातृभाषा हिंदी आणि पंजाबी असल्याने हे गाणे मराठीत गाण्यासाठी मला खूप कठीण वाटत होते, मात्र या मराठी गाण्याचे गीतकार मंगेश कांगणे आणि आमच्या दिग्दर्शकांनी मला खूपच मदत केली. मी आतापर्यंत एकच मराठी चित्रपट पहिला आहे आणि तो म्हणजे 'सैराट'.... रिंकू राजगुरूचाच. योगायोगाने आज या गाण्याच्या निमित्ताने मी तिच्यासाठीच पार्श्वगायन करत आहे. माझ्याकडून चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा."
 
अतिशय शांत आणि अर्थपूर्ण असे हे गाणे असून  मंगेश कांगणे यांनी या गाण्यासाठी मराठी बोल लिहिले आहेत.  सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. सुजॉय रॉय यांची कथा असलेल्या या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्याव्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती