२६ नोव्हेंबरला ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन

गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024 (16:51 IST)
महाराष्ट्राला लोकसंस्कृतीचा मोठा वारसा लाभला आहे. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप. महाराष्ट्राचा पहाडी आवाज असं बिरुद मिळालेले लोकशाहीर विठ्ठल उमप आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. विठ्ठल उमप आज आपल्यात नाहीत, पण त्यांची गाणी,नाटकं व आठवणी आजही मराठी रसिक मनावर रुंजी घालत आहेत. लोकशाहीर, लोकगायक, गीतकार, असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शाहीर  विठ्ठल उमप यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा पार पडणार आहे. विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे आयोजित होणारा ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला संपन्न होणार आहे.
 
सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ‘मृदगंध पुरस्कार’ देण्यात येतो. हा पुरस्कार  विशेष मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. यावर्षी पुरस्कार प्राप्त नामवंत मंडळी कोण असतील? याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्याविषयीची घोषणा विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. नंदेश विठ्ठल उमप शनिवार ९ नोव्हेंबरला एका पत्रकार परिषदेत करणार आहेत.     
 
याआधी पद्मश्री शाहीर साबळे (जीवन गौरव), ना. धों .महानोर, अशोक पत्की, सुलोचना चव्हाण, मंजिरी देव, जयंत पवार,पांडुरंग घोटकर, सुबोध भावे,  राजाराम  जामसांडेकर,  विक्रम  गोखले (जीवन गौरव ),  पद्मश्री  डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोधापल्ले,  डॉ. निलेश साबळे, शकुंतला नगरकर, अमित राज, मधुमंगेश कर्णिक (जीवन गौरव),  वसंत अवसरीकर, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अच्युत ठाकूर, ज्योती म्हापसेकर, हरेंद्र जाधव, प्रेमानंद  गज्वी, प्रशांत  दामले, अशॊक  वायंगणकर, प्राजक्ता  कोळी, रवींद्र  भिलारी, माया जाधव (जीवन गौरव), जयंत सावरकर (जीवन गौरव), डॉ. विजया वाड, उत्तर केळकर, ओम राऊत, सत्यपाल महाराज, राजेश टोपे, फ.मु .शिंदे (जीवन गौरव), पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री श्रीमती पद्मा कोल्हे, संजय मोने, श्रीमती सुकन्या मोने, रवींद्र साठे, कमलबाई शिंदे, श्रेया बुगडे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (जीवनगौरव), सुदेश भोसले, आतांबर शिरढोणकर, सुमित राघवन, चिन्मयी सुमित, केतकी  माटेगावकर  हे मान्यवर मृदगंध पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती