'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत 'मी पण सचिन' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. भारतात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय प्रेक्षक आणि क्रिकेट यांचं अगदी दृढ नातं आहे. हेच नातं एका वेगळ्या रूपात 'मी पण सचिन' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटाच्या टॅगलाइनवरून 'मी पण सचिन' हा चित्रपट एक सकारात्मक संदेश देणार हे नक्की. स्वप्नांचा पाठलाग करणे कधीही थांबवू नका, असा आशावादी विचार या चित्रपटातून व्यक्त होत आहे. एक सामान्य तरुण, त्याचा आत्मविश्वास आणि त्याची मेहनत यांच्या जोरावर अशक्य वाटणारे त्याचे स्वप्न अप्रत्यक्षपणे कसे साकार करतो त्याची गोष्ट म्हणजे 'मी पण सचिन' हा चित्रपट. गावात राहणारा एक तरुण, लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर क्रिकेट खेळण्याचं त्याचं स्वप्न आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याची असणारी लढाई, हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे. ट्रेलर मध्ये स्वप्नील तरुण आणि मध्यमवयीन अशा दोन वेगवेगळ्या रूपात समोर येत आहे. ह्या चित्रपटांमध्ये अनेक बड्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. स्वप्नील जोशी, अभिजित खांडकेकर, प्रियदर्शन जाधव, अनुजा साठे-गोखले, कल्याणी मुळे, अविनाश नारकर, सुहिता थत्ते अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे.
इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएटची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे या चित्रपटाचे निर्माता आहे. तर श्रेयश जाधव यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. आता श्रेयश जाधव चित्रपटांशी जोडले गेले असल्याने चित्रपटात नक्कीच काही तरी हटके पाहायला मिळणार हे नक्की. कारण श्रेयश जाधव यांचे मागील चित्रपट, गाणी पाहता ते नेहमीच प्रेक्षकांना नवीन देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या सिनेमात काय नवीन असणार हे पाहण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल.