'अ बॉटल फूल ऑफ होप' ठरतोय 'पिप्सी' सिनेमाचा ट्रेलर

बुधवार, 27 जून 2018 (15:55 IST)
लहान मुलांच्या निरागस विश्वाची रंजक सफर घडवून आणणारा 'पिप्सी' हा सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्राला 'अ बॉटल फूल ऑफ होप' देण्यास येत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती आणि निर्मिती असलेल्या या सिनेमाचा, अंधेरी येथील हॉली फॅमिली हायस्कूलमध्ये नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. चानी आणि बाळूच्या मैत्रीवर आधारित असलेल्या 'पिप्सी' सिनेमाच्या या ट्रेलरचा बच्चेकंपनीनेदेखील मनमुराद आनंद लुटला. मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या सिनेमातील प्रमुख बालकलाकारांसोबत पार पडलेल्या या ट्रेलर लाँच कार्यक्रमामध्ये, या दोघांनी शाळकरी मुलांसोबत  गप्पागोष्टी करत, त्यांच्यासोबत काही खेळदेखील खेळले.
ग्रामीण भागातील दोन छोट्या मुलांचे भावविश्व मांडणारा 'पिप्सी'चा ट्रेलर लक्षवेधी ठरत आहे. 'राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा माणसाचा जीव माश्यात असतो' असा समज करून, दुर्दम्य आजाराने ग्रासलेल्या आपल्या आईला वाचवण्यासाठी माश्याच्या शोधात निघालेली चानी या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसेच, आपल्या मैत्रिणीला मदत करणारा बाळूदेखील यात असून, 'पिप्सी' नामक माश्याची गोष्ट या सिनेमात असल्याचे आपणास दिसून येते. समाजातील समस्येकडे लहान मुलांचा पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्यातून त्यांनी काढलेला निष्कर्ष 'पिप्सी'च्या ट्रेलरमध्ये अगदी रंजकपद्धतीने मांडण्यात आला आहे.
 
सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' सिनेमातील गाणी ओमकार कुलकर्णी यांनी लिहिली असून देबारपितो साहा यांचे संगीत त्यांना लाभले आहे. लहानग्यांच्या निरागस डोळ्यातून सादर होत असलेला 'पिप्सी' हा सिनेमा केवळ बच्चेकंपनीसाठी नव्हे तर प्रौढ प्रेक्षकांसाठीदेखील आशयसमृद्ध ठरेल, अशी आशा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती