मराठी चित्रपटसृष्टीत बौद्धिक आणि सकस आशयाच्या चित्रपटांची नांदी पाहायला मिळते. त्यास जर सर्जन दिग्दर्शकाचा हातभार लाभला तर, हे सिनेमे प्रसिद्धीचे उच्चांक गाठतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित 'बोगदा हा सिनेमादेखील याच धाटणीचा आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर लाँच करण्यात आला. मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा आशय आई आणि मुलीच्या नातेसंबधावर आधारित आहे. माय-लेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीझर देखील त्यांचे नाते आपणास दिसून येते. शिवाय, कमी शब्दात खूप काही सांगून जाणारा हा टीझर पाहणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेतो.
'बोगदा' हे शीर्षक देखील विचार करण्यासारखे असून, या सिनेमातील पात्रांचे संवादही प्रेक्षकांना बरेच काही सांगून जातील असे आहे. आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणाऱ्या या स्त्रीप्रधान सिनेमाचे संवाद आणि पटकथा लेखन दिग्दर्शिका निशिता केणी यांनीच केले असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांच्यासोबत त्यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील संभाळली आहे.