विनोदी मल्टीस्टार्सचा‘वाघेऱ्या’१८ मे ला प्रदर्शित

बुधवार, 16 मे 2018 (13:59 IST)
विनोदी मल्टीस्टारर्सचा बंपर धमाका घेऊन येणारा ‘वाघेऱ्या’सिनेमा येत्या १८ मे रोजी सिनेप्रेक्षकांना खळखळून हसवण्यास येत आहे. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवले यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचा पोस्टर आणि ट्रेलर प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करीत आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर एक गोगलधारी बकरी आपल्याला पाहायला मिळते. तसेच ‘सांभाळून या राव, येडं झालंय गाव' या टॅगलाईनमुळे हा सिनेमा विनोदयुक्त मेजवानीचा परिपूर्ण आनंद प्रेक्षकांना देणार, हे लक्षात येते. तसेच या सिनेमाच्या ट्रेलरमधून एका मागोमाग एक अश्या मातब्बर मराठी विनोदवीरांची फळीदेखील आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे, 'वाघेऱ्या' सिनेमात 'वाघ'असो वा नसो, पण किशोर कदम, भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या विनोदी मल्टीस्टार्सच्या विनोदांची डरकाळी नक्कीच सिनेरसिकांना ऐकू येणार आहे.
 
सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे लेखन तसेच दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. या सिनेमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून 'वाघेरया' गावात वाघ शिरला असल्याची चर्चा होते. मग त्या वाघाला शोधण्यासाठी चाललेली धावपळ आणि यातून निर्माण होणारे समज-गैरसमज या सिनेमात विनोदी ढंगात मांडण्यात आले आहे. या ट्रेलरबरोबरच, सिनेमाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील लिखित आणि संगीतकार मयुरेश केळकर दिग्दर्शित 'उनाड पोरं' हे उडत्या चालीचे गाणेदेखील यावेळी प्रदर्शित करण्यात आले. आदर्श शिंदेच्या भारदस्त आवाजातील हे गाणे सिनेरासिकांचे भरघोस मनोरंजन करणारे ठरत आहे. तसेच एका रिअॅलिटी शोमधून नावारूपास आलेला प्रसनजीत कोसंबीच्या आवाजातील 'वाघेऱ्या' सिनेमाचे प्रमोशनल सॉंगदेखील प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करण्यास लवकरच येत आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी खात्री आहे.  
 
'वाघेऱ्या' गावातली पात्रदेखील अतरंगी आहेत. लग्नाच्या बोहल्यावरून थेट कामावर रुजू झालेल्या, एका नवविवाहित तरुणाच्या भूमिकेत ऋषिकेश झळकणार आहे. यात तो एका वनाधीकाराच्या भूमिकेत दिसणार असून, किशोर कदम यांचीदेखील विनोदी व्याक्तीरेखा यात आहे. वाघे-या गावच्या सरपंचची भूमिका त्यांनी यात वठवली असून, पहिल्यांदाच ते एका विनोदी भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. भारत गणेशपुरे यांच्या विनोदाचा उंचावलेला स्तरदेखील यात पाहायला मिळणार असून, एकाहून एक असलेल्या सर्व विनोदी कलाकारांची जत्राच यात सिनेमात पाहायला मिळणार असल्यामुळे, विनोदाचे चक्रीवादळच जणू 'वाघे-या'च्या निमित्ताने महाराष्ट्रात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती