मराठी सिनेसृष्टीतील कवीमनाचा माणूस अशी ओळख असणारा मंदार चोळकर एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आतापर्यत अनेक सिनेमांच्या गाण्यांचे तसेच मालिकांचे शीर्षक गीत लिहिणारा मंदार लवकरच 'सरगम' चे लेखन करताना दिसून येणार आहे सरगम हे एका गाण्याचे सूर नसून तर एका कार्यक्रमाचे नाव आहे. झी युवा वाहिनीवर प्रसारित होत असलेल्या सरगम या संगीत विषयक कार्यक्रमाच्या भागांचे मंदार सध्या लिखाण करीत आहे, त्यामुळे आता तो गीतकार असण्यासोबतच लेखकदेखील बनला आहे.
याविषयी सांगताना मंदारने सांगितले की, मी आतापर्यत केवळ गीतलेखन केले आहे, त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमासाठी निर्मात्यांकडून विचारण्यात आले, तेव्हा सुरुवातीला हे काम मला खूप कठीण वाटले होते. पण, या कार्यक्रमाचे काही भाग लिहिल्यानंतर मला आता ते खूप सोपं वाटू लागलं आहे. या कार्यक्रमात येणाऱ्या दिग्गजांविषयीची माहिती कार्यक्रमाद्वारे दिली जाते. अशावेळी त्यांच्याबद्दलची माहिती तसेच त्यांचे किस्से माहित असलेला व्यक्ती गरजेचा होता. मी यातील अनेकांसोबत काम केले असल्यामुळे मला ते अगदी सहज गेलं, हे काम करायला खूप मजा येत असून खूप काही शिकायला देखील मिळत आहे, असे मंदार सांगतो. पूर्वी असे कार्यक्रम हे वेळखाऊ असतात असे मंदारला वाटायचे, त्यामुळे यापासून तो काहीकाळ दूरच राहिला होता, पण आता तो हे सगळे एन्जॉय करत असून याबरोबरच त्याचे गाणी लिहिणेदेखील सुरूच आहे. विशेष म्हणजे नवनिर्वाचित लेखक बनलेल्या मंदारने 'सरगम' चे शीर्षक गीतदेखील लिहिले आहे.