उमेश कामत आणि प्रिया बापटसोबत जर तरची गोष्ट रंगणार

गुरूवार, 9 मे 2024 (17:50 IST)
सुपरस्टार उमेश कामत आणि प्रिया बापट यांची प्रमुख भूमिका असलेले मराठी नाटक 'जर तरची गोष्ट' सानंद न्यासच्या पाच प्रेक्षक गटांसाठी शुक्रवार, 10 मे 2024 पासून, स्थानिक यू. सी. सी. ऑडिटोरियम (देवी अहिल्या विद्यापीठ, खंडवा रोड, इंदूर) येथे सादर करण्यात येत आहे.
 
सानंद ट्रस्टचे अध्यक्ष श्री श्रीनिवास कुटूंबळे आणि मानद सचिव श्री जयंत भिसे यांनी सांगितले की, मुंबई स्थित सोनल प्रॉडक्शन संस्थेने निर्मित जर तरची गोष्ट हे नाटक महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे.
 
उमेश कामत हे एक भारतीय अभिनेता आणि मॉडेल आहे, जे प्रामुख्याने मराठी प्रादेशिक चित्रपट, मराठी टेलिव्हिजन मालिका, मराठी नाटके आणि टीव्ही जाहिरातींमध्ये काम करतात. उमेश कामत हे उत्कृष्ट आणि प्रस्थापित अभिनेता म्हणून ओळखले जातात.
 
प्रिया बापट ह्या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, त्यांनी 2000 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. हॅपी जर्नी या मराठी चित्रपटासाठी आपल्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. मुन्ना भाई एम. बी. बी. एस., लगे रहो मुन्ना भाई, काकस्पर्श, आम्ही दोघे, भेट, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, टाईमपास-२, टाईमपास-३, लोकमान्य एक युग पुरुष, गुलाबजाम मधील भूमिकांसाठी त्यांचे खूप कौतुक केले जाते. रफूचक्कर, सपनों का शहर, आणि काय हवंय नामक वेब सिरीजमध्येही यांनी आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.
 
नाटकात साथ देणारी टीम- पल्लवी अजय, आशुतोष गोखले, दिग्दर्शक-अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील, लेखिका इरावती कर्णिक, नेपथ्य-संदेश केंद्र, संगीत-श्रीनाथ म्हात्रे, प्रकाश योजना-अमोघ फडके, वेशभूषा-श्वेता बापट, निर्माते नंदू कदम.
 
सानंद ट्रस्टचे श्री. कुटुंबळे व श्री. भिसे यांनी सांगितले की, 'जर तरची गोष्ट' हे मराठी नाटक 10 मे 2024, शुक्रवार संध्याकाळी मामा मुझुमदार गटासाठी सायंकाळी 6.30 वाजता, त्याचप्रमाणे रामुभैय्या दाते गटासाठी दि. शनिवार, 11 मे 2024 रोजी दुपारी 4 वाजता आणि राहुल बारपुते गटासाठी सायंकाळी 7.30 तर वसंत समूहासाठी दि. रविवार, 12 मे 2024 रोजी दुपारी 4 वाजता आणि बहार गटासाठी संध्याकाळी 7.30 वाजता नाटक रंगणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती