राकेश बापटने घरात साकारली इको फ्रेंडली गणेशमूर्ती

गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (16:40 IST)
महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्य दैवताचे आगमन आता प्रत्येकाच्या घरात आणि सार्वजनिक मंडळात झाले आहे. कोणाच्या घरी दीड दिवस तर कुणाच्या पाच, सात आणि दहा दिवसासाठी विराजमान झालेल्या बाप्पाच्या खिद्मतीस तसूभरदेखील कमतरता भासू नये, याची पूर्वतयारी प्रत्येकांनीच केली होती. मराठी सेलिब्रिटीजच्या घरीदेखील गणेशोत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. मात्र, हिंदी आणि मराठीचा छोटा व मोठा पडदा गाजवणा-या राकेश बापटच्या घरी विराजमान झालेल्या गणेशमूर्तीची बातच न्यारी आहे. ही गणेशमूर्ती राकेशने स्वहस्ते तयार केली असून, त्यासाठी त्याने नदीच्या गाळाचा आणि नैसर्गिक रंगाचा वापर केला आहे. आपल्या बाप्पाची प्रतिकृती बाजारातून विकत न घेता स्वतःच्या हाताने बनवून, त्याची अगदी भक्तिभावाने बापट कुटुंबात प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. अश्याप्रकारे घरातच गणेशमूर्ती बनवणा-या या मराठीतील 'राजन'चा यंदाचा गणेशोत्सव अनेक कारणांनी खास ठरतोय. याबद्दल बोलताना राकेश सांगतो की, 'गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा माझ्याघरी पूर्वीपासून आहे. मी गेले अनेक वर्ष गणपतीची मूर्ती बनवतो. गणपती बनवताना कोणता आकार किवा कोणत्या थीमवर बनवायचा हे मी कधीच ठरवत नाही, मला फक्त बाप्पा साकारायचा असतो.'
 
आजच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला राकेश समर्थन देत असून, प्रत्येकांनी इको फ्रेंडली गणेशाची स्थापना करावी असा संदेशदेखील तो देतो.  शिवाय याच वर्षी त्याचा भरत सुनंदा दिग्दर्शित 'राजन' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे, या व्यतिरिक्त मराठीतील आणखीन दोन सिनेमांचेदेखील काम सुरु असल्यामुळे बाप्पाचा तिहेरी शुभार्शिवाद राकेशला मिळाला आहे. हिंदी प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले असून, माझी मातृभाषा असलेल्या मराठीतही मला विशेष ओळख निर्माण करायची आहे, त्यासाठी मला मराठी प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळो, अशी प्रार्थना तो गणेशाकडे करतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती