जगण्याशी असलेला संघर्ष दाखवणारा बंदूक्या

गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (12:52 IST)
'वादळवाट' 'घडलंय बिघडलंय' यासारख्या विविध प्रकारच्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री अतिशा नाईक एका प्रेमळ, मायाळू पण राकट आईच्या भूमिकेत पाहण्याचा योग पहिल्यांदाच येतोय तो १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'बंदूक्या' सिनेमातून. या सिनेमातील ही 'सुरंगी' प्रेक्षकांच्या बराच काळ स्मरणात राहील. तिच्याशी केलेली ही खास बातचीत...                 
                                                                     
वर्षा सिनेव्हिजनची निमिर्ती असलेल्या या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन राहूल मनोहर चौधरी यांनी केलं आहे. एका विशिष्ट समाजातील हृदय हेलावणाऱ्या रूढी परंपरेवर आधारित या सिनेमाची कथा आहे. ज्यात परिस्थितीमुळे होरपळलेली आणि समाजातील मूळ प्रवाहापासून मैलोनमैल लांब असलेली माणसं आहेत. अशा सिनेमाचा एक प्रमुख भाग असलेली अतिशा म्हणते, दारूची हातभट्टी चालवत असलेली ही सुरंगी तिच्या मुलासाठी म्हणजेच आवल्यासाठी तितकीच हळवी आहे. माणसांचा जगण्यासाठीचा संघर्ष लेखक दिग्दर्शकाने अतिशय उत्तम आणि मार्मिक पद्धतीने सिनेमात मांडला आहे.

सिनेमाची कथा-पटकथा-संवाद यांचा अनोख्या पद्धतीचा लहेजा छान एंटरटेनिंग आहे. एका विशिष्ठ प्रकारची गुळमाट  (गोड) भाषा प्रेक्षक पहिल्यांदाच अनुभवातील. त्यामुळे संवादातील प्रत्येक शब्द तोंडपाठ करण्या व्यतिरिक्त पर्याय नव्हता. हे सगळं फार सरळ-सोपं आणि चटकन जमेल असंही नव्हतं. सिनेमातील एका चित्रीकरणादरम्यान माझी चांगलीच घालमेल झाली होती. एका कोंबड्याचे पाय उलटे धरून त्याला हलवत चालणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. मला प्राणी खूप आवडतात त्यामुळे त्यांची जमेल आणि होईल तशी मी काळजी घेते मात्र हा सीन करताना मला त्या कोंबड्याची खूप काळजी वाटत होती. तो जिवाच्या आकांताने फडफडताना चोच मारेल की काय अशी भीतीही वाटायची. मात्र तरीही तठस्थ राहून चित्रीकरण पूर्ण केलं. त्यानंतर त्या कोंबड्याची सगळी काळजी घेतली गेली. 'बंदूक्या' बद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर निर्माता दिग्दर्शक यांचा सखोल अभ्यास आणि चित्रपटाच्या टीमचं उत्तम टीमवर्क जुळून आलं आहे.  सिनेमामध्ये एंटरटेनमेंट एलिमेंट जर पाहायचं झालंच तर सिनेमाची बोलीभाषा, सगळ्या कलाकारांचा अभिनय आहे. नाशिक गुजरात बॉर्डर जवळ असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये डिसेंबर महिन्यात ४ ते ५ अंश सेल्सियसच्या बोचऱ्या थंडीत सिनेमाचं शूटिंग होतं.  हे सगळं चॅलेंजिंग असूनही खूप मजा आली. आजचा सिनेमा प्रगत आणि प्रगल्भ होत आहे. साचेबद्धपणा कमी होऊन वेगळ्या धाटणीच्या विषयांची हाताळणी होतेय हे बंदूक्याच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल हे नक्की.. 

वेबदुनिया वर वाचा