आशुतोष गोवारीकर यांना गोदा पुरस्कार जाहीर

बुधवार, 31 जानेवारी 2024 (09:24 IST)
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे गोदा पुरस्कार मंगळवारी जाहीर करण्यात आले आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर एक वर्षी देण्यात येणाऱ्या गोदा गौरव पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे सल्लागार अॅड. विलास लोणारी यांनी केली.
 
ज्येष्ठ लेखक कवी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. वा ‌.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या स्मृतीपित्यार्थ कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर एक वर्षात गोदा गौरव हा पुरस्कार विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रदान करण्यात येतो.
 
यावर्षी या पुरस्काराचे सतरावे वर्ष आहे. यंदा ज्ञान क्षेत्रातून एमकेसीएलच्या माध्यमातून शिक्षणात क्रांती घडविणारे विवेक सावंत, नृत्य श्रेणीतून भरतनाट्यम करणाऱ्या डॉ. सुचिता भिडे चाफेकर , क्रीडा क्षेत्रातून ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले, लोकसेवा क्षेत्रातून मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ.शमसुद्दिन तांबोळी, चित्रपट क्षेत्रातून ज्येष्ठ दिग्दर्शक अभिनेता पटकथा लेखक निर्माते आशुतोष गोवारीकर, चित्र क्षेत्रातून शिल्पकला व चित्रकलेसाठी देश विदेशात वाळू शिल्प करणारे प्रमोद कांबळे, आदींना दिनांक १० मार्च रोजी गुरुदक्षिणा सभागृह एचपीटी कॉलेज या ठिकाणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह सन्मानपत्र आणि २१  हजार रुपये रोख अशा स्वरूपाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
 
यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त गुरमीत बग्गा, कोषाध्यक्ष अँड.अजय निकम, सल्लागार लोकेश शेवडे ,मकरंद हिंगणे, यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती