'एक थी बेगम २' ३० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर

मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (16:04 IST)
प्रेम तुम्हाला अनपेक्षित गोष्टी करण्यास भाग पाडते. परंतु सूडबुद्धीची आग तुम्हाला अशा काही गोष्टी करण्यास भाग पाडते, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. बहुप्रतीक्षित 'एक थी बेगम' चा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला असून यात अनुजा साठे अशरफ भाटकरच्या भूमिकेची पुनरावृत्ती करताना दिसेल मात्र ती लीला पासवान या नावाने. मकसूदचे बेकायदेशीर साम्राज्य उलथवून टाकण्याचा आणि तिचा पती झहीरच्या (अंकित मोहन) मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रतिज्ञेचे पालन करत, ती या सीझनमध्ये निर्भयपणे पुरुषांच्या जगात वर्चस्व गाजवताना दिसणार आहे. सत्तेतील प्रत्येकजण तिच्या शोधात आहे. अंडरवर्ल्ड, पोलीस आणि राजकारणी असे सगळेच.
 
सिझन १ मध्ये अशरफच्या आयुष्यावर भाष्य करण्यात आले आहे. ज्यात तिचा पती झहीर, एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन मकसूदचा (अजय गेही) विश्वासू होता, जो मारला गेला. त्यानंतर अशरफ सपना या नावाने बार डान्सर बनून झहीरच्या हत्येसाठी जबाबदार ठरलेल्या प्रत्येकाला मारण्याची योजना आखते. मात्र तिच्या योजना निष्फळ ठरतात आणि सिझन १चा शेवट अशा एका टप्प्यावर येतो जिथे अशरफ जिवंत राहणार की नाही, हा प्रश्न उद्भवतो.
 
सिझन २ची सुरुवात लीला पासवानच्या शोधाने होते. अशरफने घातलेला आणखी एक वेष ज्यात, ती मृत्यूला पराभूत करून दुबईच्या भयानक आणि शक्तिशाली डॉनला गुडघ्यावर आणण्याच्या तिच्या ध्येयाकडे परतते.
 
लेखक, दिग्दर्शक सचिन दरेकर म्हणतात, “गुन्हेगारी विश्वाने मला नेहमीच आकर्षित केले आहे. बंदुका आणि टर्फ युद्धांमुळे नाही तर या गुंडांवर राज्य करणाऱ्या अंतर्निहित भावनांमुळे. सिझन २ मध्ये सूड उगवण्याची भावना, ज्या गोष्टींच्या तुम्ही विरोधात आहात, त्याच गोष्टी करणे आणि या गोष्टी करताना तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या लोकांची किंमत मोजावी लागणे, हे दाखवण्यात आले आहे.''
 
तर अशरफची भूमिका साकारणारी अनुजा साठे म्हणते, ''सर्वात शक्तिशाली लोक ते असतात, ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नसते. तिच्यासाठी, तिच्या प्रेमासाठी जे सर्वात महत्वाचे होते, ते माझ्या व्यक्तिरेखेने आधीच गमावले आहे. आपल्या पतीचा बदला घेण्यासाठी आणि तिची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी तिने कोणत्याही थराला जाण्याचा निर्धार केला आहे. माझा विश्वास आहे, तिची अडथळ्यांवर मात करण्याची दृढता आजच्या स्त्रियांच्या लढाईचे प्रतिनिधित्व करणारी आहे. जी त्यांच्या जगातील काचेचे आवरण तोडण्यासाठी लढत आहे. हा प्रवास माझ्यासाठी खरोखरच खूप खास आणि संस्मरणीय आहे."
 
गुन्हेगारी, नाटक, भावना आणि सूडबुद्धीने तुम्ही पुन्हा एकदा अशरफच्या प्रवासाचे अनुसरण करण्यास तयार आहात का?
 
सचिन दरेकर आणि विशाल मोढावे दिग्दर्शित या सीरिजमध्ये शहाब अली, चिन्मय मांडलेकर, विजय निकम, रेशम श्रीवर्धनकर, राजेंद्र शिसटकर, नझर खान, हितेश भोजराज, सौरासेनी मैत्रा, लोकेश गुप्ते, मीर सरवर, पूर्णनदा वांडेकर आणि रोहन गुजर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
 
एमएक्स ओरिजनल सीरिज  'एक थी बेगम २' चे सर्व भाग ३० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती