निर्माते डॉ. लालासाहेब शिंदे यांची सामाजिक बांधिलकी

बुधवार, 30 मे 2018 (12:22 IST)
सुप्रीम मोशन पिक्चर्सअंतर्गत मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार सिनेमांची निर्मिती आणि प्रस्तुती करणारे तसेच एल.व्ही.शिंदे ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष लालासाहेब शिंदे यांना ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशन अँड मेडिसिन ऑफ कोलंबो (श्रीलंका ) तर्फे डॉक्टरेट इन लिटरेचर या पदवीने नुकतंच सन्मानित करण्यात आले. वयाच्या ६७ व्या वर्षी शिकण्याची उमेद कायम राखत यशस्वी होणारे लालासाहेब शिंदे यांचा आदर्श समाजासाठी हितावह असाच आहे. कारण, केवळ चित्रपट निर्मितीमध्येच नव्हे तर, सामाजिक बांधिलकीमध्येदेखील लालासाहेब शिंदे यांचे महत्वाचे योगदान आहे. दुष्काळग्रस्त भागात समाजकार्य करणारे उद्योजक लालासाहेब शिंदे यांनी अनेक गावांना मदतीचा हात दिला आहे. तसेच समाजातील वंचितवर्गासाठी मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेल्या लालासाहेबांना समाज भूषण पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आले आहे.

सातारा येथील करंजखोप गावात जन्माला आलेल्या लालासाहेब शिंदे यांनी लहानपणापासून दुष्काळाचा जवळून अनुभव घेतला होता. तेथे आर्थिक कुमक पुरेसी नसल्याकारणामुळे १९७३ साली लालासाहेब यांनी पुण्यात स्थित्यंतर केले होते. तिथे त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कार्यकर्ते म्हणून एक वर्ष काम केले. त्यादरम्यान को ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापनादेखील त्यांनी केली. त्यानंतर विविध कामगारांच्या गरजा समजून घेऊन लालासाहेबांनी १९८३ मध्ये सुप्रीम सर्व्हिसेसची स्थापना केली. याअंतर्गत आज जवळपास १०,००० कामगारांना रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
 
'बॉईज', 'कॉफी आणि बरंच काही' तसेच 'आजोबा' अश्या सुपरहिट सिनेमांची निर्मिती करून मराठी सिनेसृष्टीतदेखील लालासाहेबांनी आपला यशाचा झेंडा रोवला आहे. तसेच टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा उद्योग, एल वि शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट अशा विविध महत्वाच्या बाजू लालासाहेब यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांच्या अशा प्रयत्नांतून आजवर अनेकांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या पाठिंबा मिळाला आहे. पुणे शहरातील आयटी क्षेत्रातील कामगारांसाठी लालासाहेबांनी सिटीझिप, मेट्रोझिप अशा खास सुविधा असलेल्या बस सेवा सुरु केल्या आहेत. गरिबांना, अंधांना मदत करण्यासाठी लालासाहेबांनी आतापर्यंत शिवतेज नागरी पतसंस्था,शिवशक्ती नागरी सहकारी पतपेढी आणि शिवांजली सहकारी पतपेढी या संस्था स्थापन केल्या आहेत.
 
शासनाची मदत अपुरी पडत असल्यामुळे, आजही अनेक गावे पाण्याविना ओसाड आहेत. त्यामुळे आपापल्यापरीने मदतीचा हात पुढे करत ही उणीव भरून काढणाऱ्या समाजसेवकांची समाजाला मोठी गरज आहे. आज ठीकठिकाणी मोठ्याप्रमाणात श्रमदान होत असून, यांत तरुणांची संख्या मोठी आहे. समाजसेवेसाठी रणशिंग फुंकणाऱ्या अशा सर्व तरुणांसाठी लालासाहेब शिंदे यांचे समाजकार्य बहुमूल्य ठरणारे आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती