ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबातील तसेच समाजातील एक अनुभवसंपन्न घटक आहे. त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन आजच्या पिढीला, त्यांच्या आगामी वाटचालीसाठी नेहमीच उपयोगी पडत असतात. म्हणूनच तर, त्यांच्या छत्रछायेखाली काही निवांत क्षण घालवण्यासाठी मराठीचा सुपरस्टार अंकुश चौधरीने, ज्येष्ठ नागरिक संघ लक्ष्मी, चीरानगर ठाणे या वृद्धाश्रमातील काही ज्येष्ठ नागरिकांसोबत 'देवा' सिनेमाचा आस्वाद घेतला. इनोव्हेटीव्ह फिल्म्स आणि आणि प्रमोद फिल्म्सची निर्मिती असलेल्या 'देवा' सिनेमातील अंकुशच्या अतरंगी व्यक्तिमत्वाची मज्जा ज्येष्ठांनीदेखील पुरेपूर लुटली.
आयुष्याच्या उत्तरायणात आनंदी आणि स्वच्छंदी राहण्याच्या हेतूने हा सिनेमा खास ज्येष्टांपर्यत पोहोचवण्यासाठी 'देवा' सिनेमाच्या टीमकडून हा यशस्वी उपक्रम राबवण्यात आला.ज्येष्ठ नागरिकांच्या सुखाचा विचार करणारा सिनेमातला हा 'देवा' केवळ चित्रपटापुरताच मर्यादित न राहता, वास्तव्यातही या निमित्ताने समोर आला. मुरली नलप्पा दिग्दर्शित हा सिनेमा आयुष्याला नवी उमेद आणि आशावाद देत असल्यामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना 'देवा' सिनेमा दिशादर्शक ठरत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखील हा सिनेमा महत्वपूर्ण ठरत असून, त्यांच्या तणावरहित आणि निरोगी आयुष्यासाठी 'देवा' सिनेमातून संदेश देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. सिनेमा पाहिल्यानंतर या सर्वांनी आशीर्वादाबरोबरच, देवा सिनेमातील कामगिरीबद्दल अंकुशचे भरभरून कौतुकदेखील केले. अंकुशनेसुद्धा या सर्वांना नववर्षाचे शुभेच्छा देत, आभार मानले.