तरुणाईच्या हृदयातला हळवा कोपरा म्हणजे 'कॉलेज'... जिद्द, मैत्री, धम्माल-मस्ती यातून आलेला बेदरकारपणा म्हणजे 'कॉलेज'... आयुष्याच्या प्रत्येक वळणाला आव्हान देणं म्हणजे 'कॉलेज' आणि या साऱ्यांची सरमिसळ म्हणजे 'कॉलेज डायरी'. मनाने तरुण असणारा प्रत्येकजण कधी ना कधी आपली 'कॉलेज डायरी' उघडून त्यात रममाण होत असतो. अशीच एक 'कॉलेज डायरी' आपल्याला पुन्हा तरुण करण्यासाठी चित्रपटगृहांत दाखल होत आहे. भावेश काशियानी फिल्म्स, आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत आणि अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटाचे संगीत अनावरण, तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारे प्रसिद्ध गायक बेन्नी दयाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निर्माते भावेश काशियानी, दिग्दर्शक अनिकेत जगन्नाथ घाडगे, गायक व संगीतकार निरंजन पेडगावकर, संगीतकार रेवा, डॅनिएल, स्मिथ सुहित यांच्यासहित अनेक मान्यवर तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकार, म्युझिक टीम व प्रॉडक्शन टीम उपस्थित होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने संगीत क्षेत्रात जागतिक पातळीवर विक्रम रचला गेला आहे. एकाच मराठी चित्रपटात पाच विविध भाषांमधील पाच भाषा आणि त्या-त्या भाषांमधील सुप्रसिद्ध गायकांच्या सुरेल स्वरांनी सजलेली आणि पाच संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली 'कॉलेज डायरी' मधील ही गाणी म्हणजे रसिकांसाठी दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेला हा कर्णमधुर सोहळा अधिक खुलून आला तो बेन्नी दयाल यांच्या गाण्यामुळे. 'बत्तमीज दिल', 'बँग बॅंग', 'पप्पू कान्ट डान्स', 'डिस्को डिस्को' यांसारख्या पार्टी सॉंग्सवर साऱ्यांना नाचवणारे बेन्नी दयाल तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. 'कॉलेज डायरी' मध्ये 'कोरंगु पट्टू' या तामिळ गीताला त्यांनी स्वरसाज चढवला आहे असून अश्विन यांचे शब्द आहेत तर या गाण्याला रेवा यांचे संगीत लाभले आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश आणि तामिळ अशा पाच भाषांमध्ये गायलेल्या या गाण्यांच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदाच एक यशस्वी प्रयोग करण्यात आला असून विशेष म्हणजे या गाण्यांच्या निमित्ताने मराठीत सुप्रसिद्ध गायकांची मैफलच जमली आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही शान, बेन्नी दयाल, शाल्मली खोलगडे, आनंदी जोशी आणि निरंजन पेडगावकर यांनी ही गाणी गायलेली आहेत. 'पलके’, ‘राइज अँड फॉल’, ‘हे मन माझे', 'लहरे', 'सर्वशक्तिमानम' ही इतर गाणी असून ती गणेश-सुरेश आणि गणेश साबळे यांनी लिहिली आहेत तर डॅनिएल स्मिथ-सुहित, निरंजन पेडगावकर आणि रेवा यांनी ती संगीतबद्ध केली आहेत.
'कॉलेज डायरी' ची कथा अनिकेत जगन्नाथ घाडगे यांनी लिहिली असून संवाद अनिकेत जगन्नाथ घाडगे आणि विशाल सांगले यांचे आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन ढोबळे पाटील असून मार्केटिंगची जबाबदारी श्रीनिवास कुलकर्णी आणि राजू अनासपूरे सांभाळीत आहेत. या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, शिवराज चव्हाण, अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे, शुभम राऊत, हेमलता रघू, जनार्दन कदम, आदींच्या भूमिका आपल्याला पाहता येतील. १६ फेब्रुवारीला 'कॉलेज डायरी' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून त्याआधी चित्रपटामधील विविध भाषांतील ही पाच गाणी प्रेक्षकांची मनं जिंकतील यात काही शंका नाही.