'गर्ल्स'च्या छबीला मिळणार हजारो 'लाईक्स'

गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (14:18 IST)
प्रदर्शनापूर्वीच 'गर्ल्स' चित्रपटाचा ट्रेलर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाचा ट्रेलर यूट्यूबवर ट्रेण्डिंगमध्ये असतानाच आता या सिनेमाची गाणी सुद्धा जबरदस्त गाजत आहेत. आतापर्यंत 'गर्ल्स' सिनेमाची दोन गाणी प्रदर्शित झाली असून या गाण्यांना प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या चित्रपटातील तिसरे 'छबीदार छबी' हे गाणे प्रदर्शित झाले. 'छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारोने लाईक्स माझ्या डीपी'ला असे हटके आणि आजच्या मुलींना अगदी सहज कनेक्ट होतील, असे बोल या गाण्याचे आहेत. अगदी अनोख्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने हे गाणे  गीतकार जय अत्रे यांनी लिहले आहे. तरुणाईला आवडेल असे संगीत प्रफुल - स्वप्नील यांनी दिले आहे. या सिनेमातील हे गाणे जेव्हा पूर्ण झाले तेव्हा सगळ्यांना हे गाणे इतके आवडले, की लगेचच एका झटक्यात सर्वांनी गाण्याला त्यांचा होकार दिला.  
 
ह्या गाण्याचे बोल कानावर पडताच काहींना वाटेल, की हे जुनेच गाणे शब्दांची तोडफोड करून पुन्हा रिमिक्स केले आहे. मात्र असे बिल्कुल नाहीये. जेष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या 'छबीदार छबी' या गाण्याचे मुख्य शब्द उचलून जय अत्रे यांनी हे गाणे पुन्हा लिहिले आहे. तसेच राम कदम यांच्या श्रवणीय संगीताला प्रफुल-स्वप्नील यांनी आजच्या काळानुरूप बदलून संपूर्ण नवीन गाणे प्रेक्षकांसमोर आणले आहे. जुने 'छबीदार छबी' हे गाणे उषा मंगेशकर यांनी गायले होते तर नवीन 'छबीदार छबी' गाणे आदर्श शिंदे आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी गायले आहे.
 
हे गाणे बघताना आणखी एक गोष्ट आपले लक्ष वेधून घेते ती म्हणजे, गाण्यातील कलाकारांची वेशभूषा. गाण्याला साजेशी आणि स्टायलिश अशी वेशभूषा या सिनेमाचे निर्माते नरेन कुमार आणि नृत्यदिग्दर्शक सागर दास यांनी ठरवली आहे.
 
एव्हरेस्ट एन्टरटेनमेंन्ट आणि कायरा कुमार क्रिएशन्स प्रस्तुत, कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित 'गर्ल्स' या चित्रपटाचे निर्माता नरेन कुमार असून विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पहिले आहे.  हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती