Bharat Maza Desh Ahe : प्रत्येक मुलाने पाहावा असा 'भारत माझा देश आहे'

गुरूवार, 7 एप्रिल 2022 (16:02 IST)
'अहिंसा परमो धर्म:' अशी टॅगलाईन असलेला पांडुरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित 'भारत माझा देश आहे' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर झाली असून आता या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसमोर आले आहे. नावावरूनच हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे, हे कळतेय. एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित हा चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
 
पोस्टरमध्ये राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत हे बालकलाकार दिसत असून त्यांच्यामध्ये एक बकरीही दिसत आहे. आता 'भारत माझा देश आहे' या चित्रपटाचा बकरीशी काय संबंध आणि तिची या चित्रपटात काय भूमिका आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. यात या बालकरांसोबत मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम आणि हेमांगी कवीही दिसत आहेत. पोस्टरमध्ये टीव्हीवर ब्रेकिंग न्यूजही दिसत आहे. ही ब्रेकिंग न्यूज नेमकी कोणती? याचे उत्तर चित्रपटातच मिळेल. 
 
चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणतात, "हा एक देशभक्तीपर चित्रपट आहे, मात्र या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे. आतापर्यंत क्वचितच असा विषय या पद्धतीच्या चित्रपटांमध्ये हाताळला गेला असेल. या चित्रपटात अनेक प्रसंग हसवत हसवत, नकळत खूप गोष्टी सांगून जातात, मनाला स्पर्शून जातात. हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रत्येक लहान मुलाने आवर्जून पाहावा, असा हा 'भारत माझा देश आहे. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय अतिशय दमदार असून प्रत्येकाने आपली व्यक्तरेखा उत्तम साकारली आहे. हा चित्रपट एक सकारात्मक दिशा देणारा आहे.''
 
    'भारत माझा देश आहे' या चित्रपटाची कथा पांडुरंग कृष्णा जाधव यांची असून निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद लाभले आहेत. .या चित्रपटाला  समीर सामंत गीत लाभले असून अश्विन श्रीनिवासन यांचे संगीत आहे. निलेश गावंड यांनी या चित्रपटाचे संकलक आहेत तर चित्रपटाचे छायांकन नागराज यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती