सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल जोडीतील अजय गोगावले यांच्या पहाडी आवाजाने लवकरच ‘वणवा’ पेटणार आहे. अहमदनगरचा तरूण दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित ‘घुमा’ या चित्रपटासाठी ‘तुझ्या नजरेच्या ठिणगीने वणवा पेटला’ हे विशेष गाणे तयार करण्यात आले आहे. गीतकार गुरू ठाकूर यांचे शब्द आणि संगीतकार जसराज-हृषिकेश-सौरभ यांचे संगीत लाभलेल्या या वणव्याचा उद्यापासून भडका उडणार आहे. गीतकार गुरू ठाकूर आणि संगीतकार जसराज जोशी यांनी जेव्हा हे गीत अजय गोगावले यांना ऐकवले तेव्हा अजय या गीताच्या प्रेमातच पडले. “हे गाणं मीच गाणार!” असे त्यांनी गुरू आणि जसराज यांना सांगितले. ग्रामीण भागातून येणारे कलाकार आणि तेथील समस्येवर भाष्य करणाऱ्या कलाकृतींप्रती अजय-अतुल यांना विशेष जिव्हाळा आहे, हे याआधीही दिसून आले आहे. दिग्दर्शक महेश काळे हा नागराज मंजुळे आणि भाऊराव खऱ्हाडे यांच्याच अहमदनगरच्या न्यु आर्ट्स महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवरील वास्तववादी चित्रण असलेल्या ‘घुमा’ला सर्वच फिल्म फेस्टीवल्स् मध्ये पुरस्कार मिळाल्याने गायक-संगीतकार अजय गोगावले यांनी एक प्रोत्साहन म्हणून हे गीत गायले आहे. गावरान ठसक्यातील या गाण्याला अजय यांचा पहाडी आवाज लाभल्याने हा वणवा यंदाच्या नवरात्रीत महाराष्ट्रभर धुमाकुळ घालणार यात शंका नाही. उद्यापासून झी म्युजीकच्या माध्यमातून या वणव्याचे लोण महाराष्ट्रभर पसरणार आहे. २९ सप्टेंबर पासून घुमा हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.