थकबाकीमुळे बहुसंख्य भाजप नेतेमंडळींचे साखर कारखाने अजूनही बंद; 237 कोटी 35 लाख रुपयांची थकबाकी

गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (15:55 IST)
गाळप हंगाम सुरु होऊन महिना झाला तरी राज्यातील अनेक साखर कारखाने अद्यापही सुरु नाहीत. ज्या कारखान्यांची थकबाकी आहे अशा कारखान्यांचा गाळपाचा परवाना साखर आयुक्तालयाने रोखून ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक कारखाने हे भाजप नेत्यांचे  असून यातील काही कारखाने खासगी आहेत तर काही सहकारी आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे  राज्यातील माजी मंत्री पंकजा मुंडे , हर्षवर्धन पाटील , राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe), बबनराव पाचपुते  यांच्या कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यांच्याकडे तब्बल २३७ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.
 
जालनामधील रामेश्वर कारखाना हा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा असून तो सध्या बंद आहे. त्यांच्याकडे २ कोटी ७४ लाख रुपये थकबाकी आहे. तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अहमदनगरमधील साईकृपा कारखान्याकडे २७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
 
तर राहुरीतील राधाकृष्ण विखे यांच्या डॉ. बाबूराव तनपुरे कारखान्याकडेही १४ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी असल्याने तोही कारखाना बंद आहे.
 
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे असलेले बैद्यनाथ, नांदेडमधील पन्नगेश्वर हे दोन कारखाने अनुक्रमे ४ कोटी, ६ कोटी रुपये थकबाकी असल्याने बंद आहेत. मात्र त्यांच्या अंबाजोगाई कारखान्याची कोणतीही थकबाकी नाही.
 
परंतु, त्यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे सादर न केल्याने हा कारखाना ही बंद आहे.इंदापूर कारखाना व सोलापूरमधील इंद्रेश्वर हे दोन्ही कारखाने हर्षवर्धन पाटील यांचे असून अनुक्रमे १२ कोटी ५० लाख व १० कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी असल्याने या कारखान्यांची गाळपाची परवानगी त्यामुळे प्रलंबित आहे.
 
रणजित मोहिते यांचा सोलापूरमधील शंकर कारखाना ३० कोटी ७६ लाखांच्या थकबाकीमुळे बंद आहे. मदन पाटील यांचे किसनवीर भुईज व किसनवीर खंडाळा या दोन्ही कारखान्यांकडे अनुक्रमे ५५ कोटी ९१ लाख व १७ कोटी रुपये थकीत असल्याने ते बंद आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती