स्टेट बँकेने मुंबईतील शाखांबाबतचा ‘तो’ वादग्रस्त निर्णय अखेर घेतला मागे

गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (14:39 IST)
मुंबई  – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबईतील दादर, गोवंडी येथील शाखांनी १ डिसेंबरपासून रविवारऐवजी दर शुक्रवारी बंद राहील, असा निर्णय घेतला होता. या निर्णयाला विविध संघटनांनी तीव्र विरोध केला. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने गोवंडी शाखा, दादर शाखा आणि नरिमन पॉईंट येथील मुख्य शाखा या ठिकाणी निवेदन देऊन हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. अखेर त्याची दखल घेत ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने हा निर्णय मागे घेतला आहे. तसे अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून जाहीर करण्यात आले आहे.
 
संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या या निर्णयामुळे जनसामान्यांमध्ये बँक मुस्लिमधार्जिणे निर्णय घेत असल्याची भावना निर्माण झाली होती. शासन नियंत्रित बँकांमध्ये एका विशिष्ट धर्माला झुकते माप देण्याचा निर्णय घेणे, हे अन्य धर्मीयांवर अन्याय केल्यासारखेच आहे. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ काही शाखांचे सुट्टीचे वारांमध्ये बदल करण्याचे नेमके कारण काय? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आता बँकेने निर्णय मागे घेतला असला, तरी केंद्र सरकारने या प्रकाराची सखोल चौकशी करून असे निर्णय घेणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती