512 पोती कांदा विकून मिळाले फक्त दोन रुपये

शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (21:24 IST)
सर्फराज सनदी, प्रवीण ठाकरे
पाच क्विंटल कांदा विकून सोलापूरच्या राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याच्या हाती अवघ्या 2 रुपयांचा धनादेश पडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
 
फेब्रुवारी अखेरीसही पावसाळी कांद्याचीच आवक आहे. हा कांदा ओलसर असल्याने त्याची साठवणूक करता येत नाही.
 
त्यामुळे या कांद्याला चांगला भाव मिळत नाही. बाजारात कांद्याचे दर घसरलेले असल्याने गृहिणींसाठी चांगली बातमी आहे पण शेतकऱ्याच्या डोळ्यात मात्र या कांद्याने पाणीच आणलं आहे.
 
घाऊक बाजारात कांदा 6 ते 7 रुपये किलोने तर किरकोळ बाजारात 20 ते 30 रुपयांनी मिळत आहे.
 
घरी वापरण्यासाठी साठवायला सुका कांदाच लागतो. मात्र तो सध्या बाजारात उपलब्ध नाही. हा सुका कांदा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात येणं अपेक्षित आहे.
 
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बोरगाव गावचे राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी दहा पोती कांदा विकला. पण त्यांच्या हातात दोन रुपयांचा धनादेश पडल्याने सगळीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजेंद्र चव्हाण यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
 
चव्हाण यांनी दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली आहे. 17 फेब्रुवारीला राजेंद्र यांनी 10 पोती कांदा सोलापूरमधल्या सूर्या ट्रेडर्स यांच्याकडे नेला.
 
दहा पोती कांद्याचे वजन 512 किलो झालं. मात्र कांद्याचे दर घसरल्याने राजेंद्र यांना प्रतिकिलो 1 रुपयाप्रमाणे दर मिळाला. वाहनभाडे, हमाली, तोलाई यांचे पैसे वजा करुन चव्हाण यांच्या हाती दोन रुपये शिल्लक राहिले.
 
कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या सूर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने राजेंद्र यांना 2 रुपयांचा धनादेश दिला. या चेकवर 8 मार्च 2023 अशी तारीख आहे. दोन रुपयांच्या चेकसाठी त्यांना परत या केंद्रात यावे लागणार आहे.
 
अन्य कांदा उत्पादकांचीही अशीच व्यथा
कांदा विक्रीतून उत्पादन खर्च तर सोडाच पण वाहतूक भाडे ट्रॅक्टर भरण्यासाठी येणार खर्च सुद्धा निघत नसल्याने नैताळे येथील शेतकरी सुनील रतन बोरगुडे यांनी काढणीस आलेल्या दोन एकर कांद्यावर रोटावेटर फिरवून कांदा मातीत मिसळून दिला. तसेच शासन राज्यकर्ते कोणीही या विषयाकडे लक्ष देत नसल्याने धिक्कार करीत शेतकऱ्यांनी निषेध केला.
 
'राज्यकर्त्यांनो लाज बाळगा'
'राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्या समोर पीक करपून जातं. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये 10 पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले, ते बघा निर्लज्ज व्यापार्याला दोन रूपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती