RBI डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

रिझर्व्ह बँक इंडिया (RBI)चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ संपण्याच्या 6 महिने आधी राजीनामा दिला आहे. आचार्य 23 जानेवारी 2017 रोजी या पदावर नियुक्त झाले होते. त्याचा कार्यकाळ 3 वर्षाचा होता. पण तो संपण्याच्या 6 महिने आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. 
 
रिझर्व्ह बँकेचे सर्वात तरुण डेप्युटी गव्हर्नर असलेले आचार्य यांनी 23 जानेवारी 2017 रोजी पदाची सूत्रं स्वीकारली होती. रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावरून सरकार आणि उर्जित पटेल यांच्यामध्ये उद्भवलेल्या संघर्षामध्ये आचार्य यांनी पटेल यांना पाठिंबा दिला होता. देशाच्या आर्थिक धोरण निश्चितीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वायत्त असणं गरजेचं आहे, अशी भूमिका आचार्य यांनी सातत्यानं घेतली होती. 
 
आरबीआयमध्ये केंद्र सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल मागील वर्षी त्यांनी चिंताही व्यक्त केली होती. या कारणांमुळेच आचार्य यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. फेब्रुवारी 2020मध्ये सीव्ही स्टार प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस येथे ते रुजू होणार होते. आचार्य यांनी आता या वर्षी ऑगस्टमध्येच अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
 
गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी RBIचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आचार्य देखील राजीनामा देतील अशी चर्चा होती. उर्जित यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला होता. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती