खासगी विमानसेवा कंपन्यांमध्ये एकेकाळी आघाडीवर असणारी जेट एअरवेज सध्या कर्ज व तोट्यामुळे आर्थिक अडचणीत आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँक समूहाने जेटला मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला असल्याने या कंपनीला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी स्टेट बँकच पुढे सरसावली आहे. यासाठी स्टेट बँकेने जेटला कर्ज पुनर्मांडणी योजना सुचवली होती. ही योजना जेटच्या संचालक मंडळाने मंजूर केल्याने जेटधील भांडवलाची पुनर्रचना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
8,500 कोटींची तूट
स्टेट बँकेने केलेल्या पाहणीनुसार जेटचे उत्पन्न व खर्च, तोटा, कर्ज यांमध्ये 8,500 कोटी रुपयांची तूट आहे. यामध्ये जेटवर असलेल्या सतराशे कोटी रुपयांच्या कर्जाचाही समावेश आहे. नवीन भांडवल, कर्जाची पुनर्रचना, मालमत्ता विक्री आदी उपायांद्वारे ही तूट भरून काढण्याचा स्टेट बँकेचा प्रयत्न आहे.