SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 30 सप्टेंबरपासून बंद होणार डेबिट-क्रेडिट कार्डवरील ही सेवा

मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (14:18 IST)
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) तुमचं अकाऊंट असेल आणि तुम्ही या बँकेच्या डेबिट-क्रेडिट (debit-credit card) कार्डवरून व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 30 सप्टेंबरपासून तुम्हाला तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डमार्फत फक्त देशांतर्गतच व्यवहार करता येणार आहेत. आंतराराष्ट्रीय व्यवहार करता येणार नाहीत. ही सेवा बंद होणार आहे. एसबीआयने याबाबत आपल्या ग्राहकांना मेसेजही पाठवले आहे.
 
रिझर्व्ह बँकेनं (RBI) डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या वापराबाबतच्या नियमांत बदल केले आहेत. हे नियम जानेवारी 2020 मध्येच लागू होणार होते. मात्र त्यानंतर मार्च आणि मग कोरोनाच्या महासाथीमुळे त्याची अंमलबजावणी सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या नियमानुसार क्रेडिट किंवा डेबिट कार्ड देताना बँकांनी ग्राहकाला देशांतर्गत व्यवहारांची सुविधा उपलब्ध करून द्यावी असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. याचाच अर्थ ज्यांना आंतरराष्ट्रीय व्यवहार करावे लागत नाहीत त्यांना ती सुविधा सुरुवातीला देऊ नये. गरज असल्यास कार्डधारक अर्ज करू शकतील.
 
आरबीआयच्या नियमांनुसार एसबीआयने आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवरील सेवांमध्ये बदल केले आहेत. या कार्डच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यवहार बंद करण्याचा निर्णय बँकेनं घेतला आहे. म्हणजे तुम्हाला आता या कार्ड्समार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवहार करता येणार नाहीत.
 
बँकेनं या कार्डवरील आंतरराष्ट्रीय व्यवहार बंद केले याचा अर्थ तुम्हाला ही सुविधा मिळणारच नाही असं नाही. नव्या नियमांनुसार आंतरराष्ट्रीय, ऑनलाइन आणि कॉन्टॅक्टलेस व्यवहारांसाठी ग्राहकाला  स्वतंत्रपणे बँकेला त्याची गरज सांगावी लागणार आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर या सुविधा हव्या असतील तर कार्डधारकाला त्यासाठी बँकेकडे स्वतंत्र अर्ज करावे लागणार आहेत.
 
त्यामुळे तुम्हाला जर एसबीआयच्या डेबिट-क्रेडिट कार्डवर आंतरराष्ट्रीय व्यवहारांची सेवा हवी असेल तर INTL असं लिहून त्यापुढे आपल्या कार्डचे शेवटचे चार नंबर टाइप करा आणि 5676791 या नंबरवर हा SMS पाठवा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती