धक्‍कादायक : सरकारी बँकांमध्ये 8,670 कर्ज घोटाळे

शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (09:41 IST)
गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये भारतातील सार्वजनिक बँकांमध्ये 8670 कर्ज घोटाळ्यांची प्रकरणे नोंद झाली असून त्याची रक्‍कम तब्बल 61 हजार कोटी रुपयांची आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत हे घोटाळे झाले आहेत. यातही पीएनबी 389 प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. 
 
गेल्या एकाच वर्षी 14,900 कोटी रुपयांची थकीत कर्जे वाढली आहेत. विशेष म्हणजे थकीत किंवा बुडीत कर्जांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. 2012 - 13 मध्ये 6,357 कोटी रुपयांच्या थकीत कर्जांचे प्रमाण आता वर्षाला 17,634 कोटी रुपये इतके फुगले आहे. ‘रॉयटर्स’ने 21 सरकारी बँकांपैकी 20 बँकांकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती, त्यातल्या 15 बँकांनी ही माहिती दिली आहे.
 
विशेष म्हणजे पंजाब नॅशनल बँक 389 प्रकरणांसह आघाडीवर असून गेल्या पाच वर्षांत एकूण घोटाळ्यातील कर्जाचा आकडा 6,562 कोटी रुपयांच्या घरात आहे. तर  बँक ऑफ बडोदा दुसर्‍या स्थानावर असून या बँकेला 4,473 कोटी रुपयांना गंडवण्यात आले आहे. तर 231 घोटाळे करून बँक ऑफ इंडियाला 4,050 कोटी रुपयांना चुना लावण्यात आला आहे. तर स्टेट बँकेमध्ये पाच वर्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांची एकूण संख्या 1,069 आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती