1 एप्रिलपासून पॅरासिटामॉलसह अत्यावश्यक औषधे महागणार, किमती 10.7 टक्क्यांनी वाढणार

शनिवार, 26 मार्च 2022 (11:26 IST)
कोरोना साथीच्या आजाराच्या कठीण काळातून बाहेर पडल्यानंतर आता सर्वसामान्यांना महागड्या औषधांचा फटका बसणार आहे. 1 एप्रिलपासून पॅरासिटामॉलसह 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती 10.7 टक्क्यांनी वाढणार आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाने शुक्रवारी या वर्षीच्या घाऊक किंमत निर्देशांकात (WPI) मागील वर्षाच्या तुलनेत 10.7 टक्के बदल जाहीर केला. याचा अर्थ सामान्य आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत समाविष्ट असलेल्या जवळपास 800 औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून10.7टक्क्यांनी वाढणार आहेत.
 
ही औषधे महागतील, पहा यादी
ताप, संक्रमण, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचाविकार आणि अशक्तपणा यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती वाढणार आहेत. यामध्ये पॅरासिटामॉल, फेनोबार्बिटोन, फेनिटोइन सोडियम, अजिथ्रोमाइसिन, सिप्रोफ्लोक्सासिन हायड्रोक्लोराइड आणि मेट्रोनिडाझोल यांसारख्या औषधांचा समावेश आहे.
 
वित्त विधेयक 2022 वर लोकसभेत उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाईसाठी सध्याच्या जागतिक परिस्थितीला जबाबदार धरले. अनेक खासदारांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणि महागाईवर प्रश्न उपस्थित केले होते. जागतिक परिस्थितीचा भारतावरही परिणाम होत असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या. सध्या युद्धाची स्थिती आहे, त्याचा परिणाम सर्व देशांवर होत आहे आणि भारत त्यापासून अस्पर्श राहू शकत नाही. असं ही त्या म्हणाल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती