उस्मानाबाद : येथील आंदोलक शेतकरी पीक विम्यासाठी आक्रमक झाले असून, अज्ञातांनी एसटी बस फोडल्या आहेत. उस्मानाबाद शहरातील तेरणा कॉलेजसमोर आंदोलकांनी टायर जाळल्याचा प्रकारही समोर आला असून, याचा परिणाम उस्मानाबाद बस डेपोच्या वाहतुकीवर झाला आहे.
ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी २४ ऑक्टोबर रोजी हे आंदोलन सुरु केलं होतं. शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, अशी त्यांची मागणी होती. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी कैलास पाटील आमरण उपोषण सुरु आहे. आमरण उपोषण करणाऱ्या कैलास पाटील यांच्या समर्थनात उतरलेल्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन सुरु केलं आहे. उस्मानाबादमधील वेगवेगळ्या भागात या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढताना दिसत आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागल्यानं परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाकडून विनंती
कैलास पाटील यांना प्रशासनाकडून दोन दिवसांपूर्वीच एक पत्र देण्यात आलं होतं. उपोषणामुळे पाटील यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागल्यानं प्रशासनाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर आपण उपोषण सोडणार नाही, असं कैलास पाटील यांनी म्हटलं होतं.