लाल मिरच्यांची विक्रमी आवक दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत

गुरूवार, 18 जानेवारी 2024 (08:56 IST)
नंदुरबार : देशातील दुस-या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असणा-या नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीची विक्रमी आवक होत आहे. आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. पुढील दीड महिना मिरचीची आवक अशीच सुरू राहण्याचा अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे. मिरचीची आवक जादा असल्याने मिरचीचा दर घसरला आहे.
 
आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे बाजार समितीतील खरेदी-विक्रीचा व्यवहार बंद होता. मात्र सोमवारपासून पुन्हा बाजार समिती सुरू झाली आहे. मिरचीची खरेदी पुन्हा सुरू झाली असली तरी जादा आवक झाल्याने मिरचीचे दर चांगलेच घसरले आहेत. सध्या मिरचीला दोन हजारपासून ते चार हजारपर्यंतचा भाव मिळत असल्याने शेतक-यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
 
देशातील सर्वांत मोठी दुस-या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबारला ओळखले जाते. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणातही यंदा येथे मोठ्या प्रमाणात मिरच्या विक्रीसाठी आल्या आहेत. नंदुरबार कृषि उत्पन्न बाजार समितीत यंदा मिरचीची विक्रमी आवक आली आहे. आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरच्यांची खरेदी येथे झाली आहे. पुढील दीड महिना मिरच्यांची आवक सुरूच राहणार असल्याचा अंदाज आहे. मिरचीचा पुरवठा जादा झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. यंदाच्या अनियमित पावसाने शेतकरी आधीच संकटात असताना आता मिरचीच्या विक्रीतून खर्चही वसूल होत नसल्याने शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती