पंजाब नॅशनल बँकेतील २८० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आता तपासयंत्रणांनी कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आहे. यात हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या देशभरातील मालमत्तांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारायला सुरुवात केली आहे. ईडीच्या अंदाजे ६० हून अधिक अधिकाऱ्यांनी नीरव मोदी यांच्या मुंबई, सुरत आणि दिल्ली येथील खासगी मालमत्ता आणि दागिन्यांच्या दुकानावर छापे मारले.सोबतच सीबीआयने नीरव मोदी यांच्या मुंबईतल्या घराला सील ठोकलं आहे.
सीबीआयने नीरव मोदी, त्यांची पत्नी अमि, भाऊ निशाल आणि आणखी एका नातेवाईकावर ३१ जानेवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पंजाब नॅशनल बँकेची २८० कोटी रुपयांची फसवणुक केल्याबद्दल सीबीआय कारवाई करत आहे. गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील कलमांतर्गत सध्या मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये, बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत नीरव मोदी यांच्या कंपनीला फायदा होईल अशी कामं केली. यातून पंजाब नॅशनल बँकेला तब्बल २८० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.