खिशाला भार ; कटिंग चहा महागला

गुरूवार, 17 मार्च 2022 (14:38 IST)
सर्व वर्गाच्या आवडतीचा पेय पदार्थ म्हणजे चहा आता दोन रुपयांनी महागणार आहे. टी कॉफी असोसिएशनच्यावतीने राज्यात चहाचे दर दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
मागील काही दिवसांपासून महागाई वाढत असल्याचे दिसत असून त्याची झळ आता सर्वसामान्यांना बसू लागली आहे. दूध दरवाढीनंतर चहाचा दर वाढवण्यात आले आहे. तसेच साखर, चहापावडर यांचे भाव वाढल्याने चहाचे दर ही वाढवण्यात आले आहेत. 
 
काही दिवसांपूर्वीच दूधाच्या दरात दोन रुपये प्रति लिटर  इतकी दरवाढ करण्यात आली होती. तसेच चहा तयार करण्यासाठी लागणारे इतर साहित्य व गॅसच्या दरातही वाढ दिसून येत असताना चहा विक्रेत्यांना आर्थिक गणित जमवणं कठीण होत होते. अशात टी कॉफी असोसिएशनच्यावतीने चहाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साधारणपणे 10 रुपयांना मिळणारा कटिंग चहा आता 12 रुपयांना मिळणार आहे. 
 
अलीकडेच दूध उत्पादक महासंघ कंपन्यांनी दूधाच्या दरात वाढ केली आहे. प्रति लिटर दूधामागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली. अशात राज्यात महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज, अमूल, मदर डेअरी आदींनी दूधाच्या दरात दोन रुपयांनी दरवाढ केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती