पांढरे सोने झळाळले! १० हजार रुपये क्विंटल; तब्बल ५ दशकांमधील सर्वाधिक दर

शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (08:42 IST)
शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेला कापूस सध्या चमकला आहे. कापसाला प्रति क्विंटल तब्बल १० हजार रुपये एवढे दर मिळाला आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या वातावरणात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड समाधानाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, कापसाला गेल्या ५० वर्षात मिळालेला हा सर्वाधिक दर आहे.
 
यंदा लांबलेला पाऊस, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे शेतपिकांवर मोठा परिणाम झाला आहे. कापसाचे पिकही यातून सुटलेले नाही. त्यामुळेच यंदा कापसाच्या उत्पादनात मोठी घट आहे. म्हणूनच भावाने उसळी मारल्याचे सांगितले जात आहे. नागपूरमध्ये एका शेतकऱ्याच्या कापसाला उच्चांकी म्हणजे १० हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. येते काही दिवस कापसाचे दर चढेच राहणार असल्याचा अनुमान काढला जात आहे. खान्देश आणि विदर्भात कापसाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. गेल्या ५ दशकातील सर्वाधिक दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय समाधानाचे वातावरण आहे. कोरोनाच्या संकटात पांढरे सोने मदतीला धाऊन आल्याची प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती