३१ जुलै पर्यंत व्यावसायिक उड्डाणांवर बंदी

शुक्रवार, 3 जुलै 2020 (22:26 IST)
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणांवर ३१ जुलै २०२० पर्यंत  बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर १५ जुलै २०२० पर्यंत बंदी घालण्यात आली होती, जी सरकारने ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे. आदेशानुसार कोरोना संकटामुळे या उड्डाणांवर बंदी ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे, असं डीजीसीएने म्हटलं आहे. तथापि, हा नियम आंतरराष्ट्रीय मालवाहतूक आणि डीजीसीएमार्फत सुट देण्यात आलेल्या उड्डाणांना लागू होणार नाही.
 
काही दिवसांपासून अशी अटकळ सुरू होती की देशांतर्गत उड्डाणे सुरू झाल्यानंतर आता केंद्र सरकार लवकरच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेईल. दरम्यान, या सर्व चर्चांना डीजीसीएने पूर्णविराम लावला आहे. डीजीसीएच्या निर्णयानंतर ३१ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही आहे. केवळ आंतरराष्ट्रीय मालवाहतूक तसंच वंदे भारत अभियान अंतर्गत उड्डाणांना परवानगी आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सरकारने ‘वंदे भारत’ मोहिमेअंतर्गत ३.६ लाखाहून अधिक भारतीयांना परदेशातून परत आणलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती