रतन टाटा, दिलीप संघवी यांची पहिली पसंती महाराष्ट्र

मंगळवार, 16 फेब्रुवारी 2016 (11:19 IST)
रतन टाटा, दिलीप संघवी, गौतम सिंघानिया, बाबा कल्याणी यांच्यासह देशातील दिग्गज उद्योगपतींनी आज गुंतवणुकीबाबत त्यांची पहिली पसंती महाराष्ट्रच असल्याचे ठामपणे सांगितले.
 
उद्योगांच्या उभारणीसाठीच नव्हे तर एकूणच स्टार्ट अप इंडियासाठी देशातील सर्वात आदर्श राज्य महाराष्ट्रच असल्याचे प्रशंसोद्गार काढत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना प्रशस्तिपत्र दिले.
 
बीकेसीवर सुरू असलेल्या मेक इन इंडिया सप्ताहात आजचा दिवस खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा होता. ‘महाराष्ट्र दर्शन’ कार्यक्रम आगीच्या भक्ष्यस्थानी पडून काही तासच झाले असताना महाराष्ट्रावर गुंतवणुकीचा अक्षरश: पाऊस पडला. दिवसभरात आज गुंतवणुकीसाठी तब्बल २ हजार २४५ करार झाले. ‘भारताच्या उत्पादन क्षेत्रात अग्रेसर महाराष्ट्र’ या विषयावरील चर्चासत्रात उद्योगपती
 
रतन टाटा, सन फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप संघवी, रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया, एरिक्सन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पाओलो कोलल्ला आणि रिलायन्स इंडस्ट्रिजचे व्यवस्थापकीय संचालक निखिल मेसवानी यांनी विचार व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योगपतींनी मांडलेल्या कल्पनांचे स्वागत करताना त्यांच्या अंमलबजावणीची हमी दिली.
 

वेबदुनिया वर वाचा