पेट्रोलचा दर प्रति लिटर 32 रुपये करा : काँग्रेस

बुधवार, 17 डिसेंबर 2014 (11:37 IST)
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठय़ा प्रमाणात घसरण झाल्याने केंद्र सरकारने पेट्रोलचा दर प्रति लिटर 32 रुपये एवढा करायला हवा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
 
सरकारकडून सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी दोन रुपयांनी कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या घसरणीचा फायदा देशातील नागरिकांपर्यंत सरकार पोहोचू देत नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
 
काँग्रेसचे महासचिव शकील अहमद म्हणाले, ‘पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फक्त दोन रुपयांची कपात करून केंद्र सरकार अशा प्रकारे नागरिकांच्या पैशाचा वापर करू शकत नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल निम्म्यावर आले आहेत. डिसेंबर 2008 मध्ये कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 147 अमेरिकन डॉलर होते आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 42 रुपये होते. त्यावेळी पेट्रोलचे दर प्रति लिटर 64 रुपये होते.
 
आता 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 70 डॉलर एवढे असल्याने, पेट्रोलच्या दरातही निम्म्याने कपात व्हायला हवी. त्यामुळे पेट्रोलचा दर प्रति लिटर 31 किंवा 32 रुपये व्हायला हवा.’  

वेबदुनिया वर वाचा