गॅसचे दर, साखरही महागणार

सोमवार, 23 जून 2014 (17:25 IST)
रेल्वे भाडेवाढीनंतर मोदी सरकारच्या दुसर्‍या कठोर निर्णयाला देशातील जनतेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. नैसर्गिक गॅसच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे सरकार याच आठवड्यात घरगुती वापराच्या गॅसचे दर वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.  मोदी सरकारने सोमवारी साखरेवरील आयातशुल्कात वाढ केल्याने साखर प्रतिकिलोमागे तीन रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केली. तीन दिवसांतली ही त्यांची दुसरी भेट होती. मोदींनी शुक्रवारी देशातील वीजेच्या परिस्थितीबाबत सुमारे पाच तास चर्चा केली होती. त्यानंतर रविवारी त्यांनी पुन्हा एकदा प्रधान यांना बोलावणे पाठवले. अर्थमंत्री अरुण जेटली यांचाही बैठकीत समावेश होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी झालेल्या बैठकीत नैसर्गिक गॅसचे दर ठरवण्याच्या मुद्यावर तत्काळ निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे या क्षेत्रावर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवला जाऊ शकतो, असेही मत व्यक्त करण्यात आले. सरकार मात्र दर वाढवण्याबाबत द्विधा मनस्थितीमध्ये आहे. मात्र, दर वाढवले नाही तर त्याचा परिणाम गॅस उत्पादन आणि एफडीआयवर पडू शकतो. त्यामुळे सीएनजीचे दर किलोमागे 2.81 रुपयांनी तर पाइपद्वारे पुरवठा करण्यात येणा-या घरगुती गॅसचे दर 1.89 रुपये प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर एवढे वाढतील; असे सूत्रांनी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा