आर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियात अनेक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीचे अनेक अधिकारी निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी नवीन नियुक्त्या करण्याची तयारी कंपनीने सुरू केली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया एक्सप्रेसचे प्रमुख पी पी सिंह यांना एका महिन्यात दुसऱ्यांदा एक्स्टेन्शन देण्यात आले आहे, तर कार्यकारी संचालक (कर्मिक विभाग) व्ही ए फरेरा 30 सप्टेंबरला निवृत्त होत आहेत.
मुख्यालयातील कार्यकारी संचालक एस मुखर्जी हे मागील महिन्यात निवृत्त झाले आहेत, तर सेंथी कुमार या संचालकांची बदली कोलकाता येथे करण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
या साऱ्या पार्श्वभूमीवर कंपनीतील अनेक पदांवर बदल्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संचालक मंडळ याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे.
कंपनीत मागील काही महिन्यांपासून आर्थिक संकट कोसळले असून, यातून मार्ग काढण्यासाठी कंपनीत अनेक बदल करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच संचालक मंडळाने जाहीर केले आहे.